भिवंडीच्या मध्यवर्ती भागातच डम्पिंग ग्राउंड

भिवंडीच्या मध्यवर्ती भागातच डम्पिंग ग्राउंड

पंढरीनाथ कुंभार
भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी शहराच्या मध्यवर्ती भागातच डम्पिंग ग्राऊंड तयार झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून हा कचरा न उचलल्याने परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. ठेकेदारांनी कचरा एकाच जागी साठवून ठेवल्याने नेहमी सायंकाळी अथवा सुटीच्या दिवशी या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार नियमित घडत आहेत. त्यामुळे कचरा ठेकेदारावर पालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. याबाबत भिवंडी महापालिका, राजकीय पुढारी, आमदार व खासदारांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही, अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून उमटत आहेत.

भिवंडी महापालिकेत सध्या प्रशासक तथा आयुक्त म्हणून अजय वैद्य हे काम पाहत आहेत. शहरातील कचरा उचलण्याचे काम नियमित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी मागील महिन्यांत जुना कचरा ठेकेदार आर अँड बी इंन्फ्रा कंपनी, बोरिवली यांची हकालपट्टी केली. तसेच त्यांच्या जागी पालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीनुसार कचरा उचलण्यासाठी खासगी ठेकेदार आयुक्तांनी नेमले आहेत. प्रभाग समिती १- निकिता खरात, प्रभाग २- प्रियांका थोरवे, प्रभाग ३- सुजित खरात, प्रभाग ४- साहिल भोईर तर प्रभाग ५- वाय. टी. इंटरप्राईस यांना शहरातील कचरा उचलून तो चाविंद्रा डम्पिंग ग्राऊंड येथे टाकण्याचा ठेका दिला आहे. त्यापैकी प्रभाग समिती पाचचे ठेकेदार परिसरात जमा झालेला कचरा शिवाजीनगर येथे टाकीत आहेत. हा कचरा पूर्णपणे चाविंद्रा येथे नेऊन टाकत नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच कचऱ्याच्या ढिगाला नेहमी आग लागून परिसरात प्रदूषण होत आहे. वास्तविक हा कचरा नियमित उचलला जातो किंवा नाही हे पालिकेच्या आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य विभागप्रमुखांनी पाहणे आवश्यक आहे; मात्र ते याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात दररोज जमा होणारा सुमारे पाचशे टन कचरा उचलून वाहतूक करून तो कचरा चाविंद्रा येथील मनपाच्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी मे २०२२ मध्ये बोरिवली, मुंबई येथील आर अँड बी इंफ्रा कंपनी यांना पालिका आयुक्तांनी ठेका दिला होता. यासाठी प्रति टन कचऱ्यासाठी एक हजार २२९ रुपये दिले जात होते. यासोबतच महापालिकेने पाच कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या वाहनांना ५० घंटागाड्या आणि २३ कॉम्प्रेसर कचरा संकलन वाहने एक रुपया या नाममात्र दराने दिली होती; परंतु ठेकेदाराने कचऱ्यावर पाणी टाकून कचऱ्याचे वजन वाढविणे, कचरा संकलन करण्यासाठी दिलेल्या जागेवर कचरा साठवून ठेवत तो कचरा डम्पिंग ग्राऊंडवर न टाकणे, शहरातील कचरा नियमित न उचलणे अशा नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने आयुक्त वैद्य यांनी या ठेकेदाराची हकालपट्टी केली; मात्र या ठेकेदारामार्फत शिवाजीनगर येथील पालिकेच्या जागेवर टाकलेला कचरा मागील सहा महिन्यांपासून पूर्णपणे उचललेला नाही. तर या साचलेल्या कचऱ्याला वारंवार आग लावली जात आहे.

तक्रारीनंतरही परिस्थितीत सुधारणा नाही
भिवंडीच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर हा परिसर येत असून त्या ठिकाणी रस्त्यावर भाजीविक्रीचे मार्केट दररोज भरते. त्या रस्त्यावरील मार्केटला इमारतीत स्थलांतर करण्यासाठी व नवीन मार्केटची इमारत बांधण्यासाठी महापालिकेने शिवाजीनगर-खडकरोड येथे आरक्षित जागा ठेवली आहे. त्या मोकळ्या जागेत गेल्या दोन वर्षांपासून कचरा साठविला जात असून त्या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत, अशी माहिती परिसरातील नागरिक आणि दुकानदारांनी दिली.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतरही अनियमितता
भिवंडी महापालिकेत आरोग्य विभागाचे कामकाज नियमित आणि सुरळीत होत नसल्याने आयुक्त वैद्य वारंवार या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत आहेत. या विभागातील आरोग्य निरीक्षकाला त्यांनी आरोग्य विभागप्रमुख केले तर कधी प्रभारी सहायक आयुक्ताला आरोग्य विभाग प्रमुख केले. मात्र, कामात नियमितता आली नाही की सुधारणा झाली नाही. आरोग्य विभागाचे कोणतेही काम तडीस नेले जात नाही. त्यामुळे मागील दोन-तीन महिन्यात सणासुदीच्या दिवशी नागरिकांना कचऱ्याचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागला. पालिकेच्या अशा कामांमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडीतील शिवाजीनगर येथे डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली आहे. तेथे जंतुनाशक औषध फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कचऱ्याला आग लावणे ही गंभीर बाब आहे, असे करू नये. स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. कामात हलगर्जीपणा आढळल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल.
- अजय वैद्य, आयुक्त, भिवंडी मनपा

महापालिकेने भाजी मार्केट बांधण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेशेजारी आम्ही शेकडो वर्षांपासून राहत आहोत. ही जागा कचरा टाकण्याची नाही. असे असताना पालिकेचे ठेकेदार येथे नेहमी टाकतात. याबाबत आम्ही महापालिका आयुक्त, भिवंडी पश्चिमचे आमदार व खासदार यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. त्यांनी नेहमी आम्ही येतो, बघतो अशी आश्वासने दिली; मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट कचरा वाढत आहे.
- नरेश काळे, रहिवासी व दुकानदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com