विविध खेळांसाठी सोयी-सुविधांसह निधीची आवश्यकता

विविध खेळांसाठी सोयी-सुविधांसह निधीची आवश्यकता

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १२ : पालघर जिल्ह्यात विविध खेळांमध्ये नैपुण्य दाखवणारे खेळाडू उदयास येत आहेत; मात्र खेळासाठी अनेक सोयी-सुविधा, मैदाने उपलब्ध नाहीत. भव्य क्रीडासंकुलाचाही अभाव आहे. खेळाडूंना पुढे नेण्यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक हवे. जिल्ह्यात ऑलम्पिकपट्टू तयार झाला, तरी पुढे खेळाडू तयार होण्यासाठी सरावासाठी जागा नाही. यांसह अनेक बाबींची कमतरता असल्याने येणाऱ्या सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा खेळाडूंसह प्रशिक्षक व्यक्त करू लागले आहेत.
जिल्हा, तालुकास्तरावर शालेय, महाविद्यालयीन कला-क्रीडा महोत्सव भरवले जातात. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात आणि चांगली कामगिरी पार पाडतात. देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारणारे खेळाडूही जिल्ह्यात आहेत; परंतु अनेक खेळांसाठी हवे तसे पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. वसईत क्रीडा संकुल, स्केटिंग, कबड्डी प्रशिक्षण असावे. जिल्ह्यातील मैदाने विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न करायला हवे, असेही खेळाडू मत व्यक्त करत आहेत. खेळ खेळताना अनेक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्या दृष्टीने नियम समजणे महत्त्वाचे असते. त्यामुळे उत्तम प्रशिक्षक, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणणे आणि येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे. कबड्डीसारखा खेळ पालघरच्या मातीत खेळणारी मुले आहेत; मात्र त्यांना मॅट व अन्य सुविधा नाहीत. बॅडमिंटन कोर्ट नाही, फुटबॉल व अन्य खेळांसाठीही हीच परिस्थिती आहे. निधीची कमतरता असल्याने उमेदवारांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा खेळाडू, क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.


धावपट्टूंसाठी पालघरमध्ये कोणत्याच सुविधा नाहीत. अनेक चांगले स्पर्धक तयार होऊन देशाचे नाव उज्ज्वल करतील, यासाठी कोणाचेही सरकार येवो त्याचा विचार झालाच पाहिजे. वसई तालुक्यात क्रीडासंकुल नाही. त्याची उभारणी झाली पाहिजे. मैदाने नसल्याने मुलांना सराव करण्यास वाव मिळत नाहीत. पालघरमधील विविध कला-क्रीडा प्रकारात मुले पुढे येत असली, तरी गुणात्मक प्रशिक्षण मिळायला हवे.
- आनंद मिनेझिस, ऑलिम्पिकपटू

साधारणत स्थानिक पातळीवर प्रोत्साहन मिळते; मात्र २०१२ पासूनच्या क्रीडा धोरणात बदल अपेक्षित आहे. निधीसाठी नवीन नियम आखले पाहिजे. त्यामुळे सर्व खेळांसाठी आणि खेळाडूंना त्याचा फायदा होईल. महागाईच्या काळात खेळासाठी पैसे खर्चिक जास्त होतात, म्हणून निधीत वाढ झाली पाहिजे. बॅडमिंटन कोर्ट सर्व तालुकानिहाय असावे. यासाठी सरकारने आखणी करावी. सोई मिळाल्या, तर स्पर्धेला वाव मिळेल.
- प्रसाद गोखले, सचिव, पालघर जिल्हा बॅडमिंटन फाऊंडेशन तथा सदस्य महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन

स्केटिंग खेळातही चांगले खेळाडू तयार होत आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यात या खेळासाठी उत्तम असे मैदान उपलब्ध झाले पाहिजे. जेणेकरून लहान मुलांपासून ते युवकांना सराव करण्यासाठी जागा मिळेल. त्या‍साठी सरकारने प्रशिक्षक नेमावे आणि स्केटिंगसाठी निधीची तरतूद करावी; जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील मुलांनाही त्याचा फायदा होईल.
- बिपीन मिश्रा, स्केटिंग, प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com