सीसीटीव्हीअभावी तपासकामात अडथळे

सीसीटीव्हीअभावी तपासकामात अडथळे

सीसीटीव्हीअभावी तपासकामात अडथळे
लोहमार्ग पोलिसांची तारेवरची कसरत

ठाणे, ता. १२ (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील दहा प्लॅटफार्मवर १७० च्या आसपास सीसीटीव्ही उपलब्ध आहेत; मात्र त्यातील दहा सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने रेल्वे पोलिसांना तपासकामात अडथळे येत आहेत. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या अतिरिक्त ५० सीसीटीव्हीच्या मागणीला सहा महिने उलटले; मात्र अद्याप सीसीटीव्ही उपलब्ध न झाल्याने रेल्वे पोलिसांची ससेहोलपट होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकांत दररोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे काही वाईट प्रवृत्ती चोरीच्या संधीच्या शोधात असतात. दहा प्लॅटफॉर्मवर हजारो प्रवाशांच्या जीविताचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची आहे. गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे पोलिसांना सीसीटीव्हीची मोठी मदत होते; मात्र सीसीटीव्ही नादुरुस्त व त्यांची संख्या अपुरी असल्याने रेल्वे पोलिसांना तपासकामात अडचणी निर्माण होत असल्याची खंत पोलिस कर्मचारी व्यक्त करत आहेत.

ठाणे रेल्वे स्थानक हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याच स्थानकावर देशभरात जाणाऱ्या गाड्यांचा थांबादेखील आहे. तसेच दररोज लाखो प्रवासी रोज ठाणे स्थानकात येत असतात; मात्र या रेल्वे स्थानकावर अपुऱ्या सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांचे फावते. तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानकाच्या दहा फलाटांवर मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, बॅग चोरी, सारखे गुन्हे घडत असतात. तसेच रेल्वेच्या डब्ब्यात घुसून बेसावध प्रवाशांचे मोबाईल, दागिने लांबविण्याच्या तक्रारीत मागच्या वर्षापेक्षा यंदा कमालीची वाढ झालेली आहे. यंदा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची संख्या ५३५ इतकी आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अथक प्रयत्न करीत १३२ गुन्ह्याची उकल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.


दहा प्लॅटफॉर्मवर बसवलेल्या सीसीटीव्हीपैकी काही सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत; तर काही सीसीटीव्ही कॅमेरे हे धूसर झाले आहेत. त्याचा फटका रेल्वे पोलिसांना बसतो. सध्या फलाटाची लांबी वाढवण्याची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत. मागणीनुसार सीसीटीव्ही कॅमेरे मिळाले, तर तपासकामासाठी मदत होईल.
- अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com