वाड्याच्या समस्यांचा वाली कोण?

वाड्याच्या समस्यांचा वाली कोण?

दिलीप पाटील : सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. १२ : तालुक्याला दोन खासदार आणि तीन आमदार लाभलेले आहेत. दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघात तालुका विभागला गेलेला आहे. याकडे कोणत्याही एका लोकप्रतिनिधीचे विशेष लक्ष नसल्याने अजूनही सोई-सुविधांची वानवा आहे. अनेक समस्या तालुक्यात आ वासून उभ्या आहेत. दुर्गम भागात तर रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी आणि वीज पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासीचे जीवन अद्यापही अंधकारमय आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
तत्कालीन डहाणू व आताचा भिवंडी लोकसभा या मतदारसंघात काँग्रेसने ३० वर्षे तर भाजपनेही १५-२० वर्षे, शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली आहे. मात्र, म्हणावा तसा विकास या तिन्ही‍ पक्षांना करता आलेला नाही. त्यामुळे या पक्षांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. वाडा तालुका हा भिंवडी व पालघर लोकसभा या दोन मतदारसंघात; तर भिंवडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ७२ मतदान केंद्रे, शहापूर ४९, तर विक्रमगड ४२ मतदार केंद्रे आहेत. अशा पद्धतीने वाड्याची विभागणी झाल्याने कोणाही एका लोकप्रतिनिधीचे विशेष लक्ष नसल्याने वाड्याच्या समस्या आहेत तशाच पडून आहेत. वाडा तालुका विविध मतदारसंघात विभागला गेल्याने खासदार, आमदार यांच्या नजरेतून कायम दुर्लक्षित राहिला आहे.

उद्योजक सुविधांपासून वंचित
वाड्याच्या मागास व आदिवासी भागाचा विकास व्हावा. गोरगरीब आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा, म्हणून तत्कालीन सरकारने १९९२ मध्ये हा भाग ‘डी प्लस झोन’ म्हणून घोषित केला. यामध्ये सरकारने उद्योजकांना सवलती जाहीर केल्या. त्यानंतर हजारो उद्योजकांनी या भागात आपले बस्तान बसवले. काही वर्षांनी सरकारने सवलती बंद केल्याने येथील उद्योजकांना आता घरघर लागली आहे. आलेल्या कंपन्यांपैकी ४० टक्के कारखाने बंद होत असल्याचे दिसून येत आहे. उद्योजकांना सरकारने सोयी-सुविधा न पुरवल्याने अनेकांनी आपला गाशा गुंडाळला आहे. रस्ता, पाणी, वीज या महत्त्वांच्या सुविधा कारखानदारांना मिळू शकलेल्या नाहीत. या पाच वर्षांत काही प्रमाणात रस्ता आणि वीज ही समस्या सुटली असली, तरी इतर समस्या तशाच आहेत.

पाण्यासाठी उद्योजकांना लाखोंचा खर्च
कारखानदारांना आजही टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. काही जण तर स्वतःच कुपनलिका मारून पाणी घेत आहेत. नेहमीच पाणी विकत घ्यावे लागत असल्याने लाखो रुपये पाण्यासाठी उद्योजकांना खर्च करावे लागत आहेत. अंतर्गत रस्त्यांची समस्या तशीच आहे. जड वजनांच्या क्षमतेचा रस्ता बनवत नसल्याने अंतर्गत रस्ते नेहमीच खड्ड्यात गेलेले असतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान व अपघात होत असतात.

सिंचनाच समस्या कायम
उद्योजकांबरोबर शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने दुबार पीक घेता येत नाही. भातपीक या एकमेव पिकावरच अंवलबून राहावे लागते. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकरी भाजीपाला, कडधान्ये, फुलशेती करताना दिसत आहेत. तालुक्याला तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या बारमाही वाहणाऱ्या पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. त्यावर बंधारे नसल्याने सिंचनाची समस्या कायम आहे.

शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना नाही
वाडा तालुक्यात शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना न आल्याने शेतकऱ्यांना या उद्योगाचा काहीही फायदा होत नाही. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला माल वाशी, ठाणे, मुंबई या बाजारपेठेत न्यावा लागत आहे. आगामी सरकारने शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना उभारावा, अशा अपेक्षा शेतकरी करत आहेत.

पोलिस ठाण्याची गरज
कुडूस ही ५२ गावांची बाजारपेठ असून, येथे औद्योगिकीकरण झाल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. परप्रांतीयांचा भरणा येथे मोठा आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे पोलिस ठाणे होणे गरजेचे असताना फक्त चार ते पाच पोलिस या भागाचा गाडा हाकत आहेत.

रस्त्याची दुरवस्था
भिंवडी-वाडा-मनोर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सिमेंट काॅंक्रीटीकरणाचा मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच करण्यात आले. मात्र, कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्याची दुरवस्था अद्यापही कायम आहे.

अतिदुर्गम भागाचा विकास खुंटलेलाच
वाडा तालुक्याच्या पश्चिमेकडील नांदणी अंभरभुई हा अतिदुर्गम भाग आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नाहीत. पाणी टंचाई या आदिवासी बांधवांच्या पाचवीलाच पुजलेली. आरोग्याची सुविधा नाही. दहा ते पंधरा किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. घनदाट जंगलाचा हा भाग असल्याने पावसाळ्यात सर्पदंश, विचुदंश, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांनी आजपर्यंत शेकडो बांधवांचा बळी गेला आहे. रोजगाराच्या कुठल्याही संधी येथे उपलब्ध नाहीत. तालुक्यातील तिळमाळ, सागमाळ, फणसगाव, उज्जैनी, पाचघर या गावांचीही परिस्थिती काही वेगळी नाही.

क्रीडांगणाचा अभाव
वाडा तालुक्यातील कोने या गावच्या हद्दीत क्रीडांगणासाठी सुमारे २० एकर जागा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या नावे आहे. मात्र, तरीही येथे क्रीडांगण होऊ शकलेले नाही. क्रीडापटूंना शहरातील क्रीडांगणाचा आधार घ्यावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com