प्रचाराचा ट्रेंड बदलला, प्रचार रॅली दुय्यम स्थानावर

प्रचाराचा ट्रेंड बदलला, प्रचार रॅली दुय्यम स्थानावर

प्रचाराचा ट्रेंड बदलला, प्रचार रॅली दुय्यम स्थानावर
मॉर्निंग वॉक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, मंडळ आणि संघटनांसोबत बैठकांचे सत्र

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वाढत्या तापमानामुळे आणि घटलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येमुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता भव्य रॅली, रोड शोसारख्या पारंपरिक प्रचाराला दुय्यम स्थान देत मतदारांसोबत सकाळी मॉर्निंग वॉकला प्राधान्य देत आपला प्रचार करण्यावर भर दिला आहे. उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सकाळी सात वाजल्यापासून मॉर्निंग वॉक, बैठका, त्यानंतर नागरिकांच्या भेटीगाठी त्या घेत आहेत. रविवारी सकाळी त्यांनी विलेपार्ले विधानसभेत मिलन सब-वे, हायवे, विलेपार्ले स्थानक, अंधेरी पूर्व अशी भव्य प्रचार रॅली काढत व्यापारी, रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, माजी आमदार विद्या चव्हाण, माजी नगरसेवक नितीन सलाग्रे, चंद्रकांत पवार, माजी नगरसेविका शुभदा पाटकर, विनी डिसोजा, मुंबई काँग्रेस सरचिटणीस विष्णू सरोदे, चिटणीस राजेश टेके, विधानसभा संघटक संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंत वसईकर, आम आदमी पक्षाचे सुंदर पाडू, प्रकाश गौर आदी उपस्थित होते. तर सायंकाळी कुर्ला पूर्व नेहरूनगर परिसरात रॅली काढण्यात आली.

उज्ज्वल निकम यांचाही भेटीगाठी, बैठकांवर जोर
रविवारचा मुहूर्त साधत महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी विविध मंडळे, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. सकाळी कुर्ला विधानसभेतील व्यापारी वर्गाची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, प्रकाश चौधरी यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लबच्या सदस्यांसोबत संवाद साधला. त्याचबरोबर कलिना येथे संरक्षण विभागाच्या आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

कार्यकर्त्यांनाही हवा सन्मान
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दलबदलूपणा केल्याने कार्यकर्तेही विभागले आहेत. एखादी रॅली किंवा सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सध्या कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांनाही मानसन्मान हवा असल्याचे दिसत आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याला रागाने बोलल्यास कार्यकर्तेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com