पावसाळ्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

पावसाळ्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : सागरी, डोंगरी आणि दुर्गम आदिवासी भागात ठाणे जिल्हा विभागलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान असते. पावसाळ्यात हे आव्हान आणखी वाढते; मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय मोठ्या तयारीने या आव्हानाला सामोरे जात असते. यंदाही या विभागाने अशी तयारी केली असून कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, शल्यचिकित्सक आणि इतर आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत तयारीत राहण्याचे निर्देश दिले आहेत.

यंदा पाऊस वेळेवर पडणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार आणि संकटे डोके वर काढत असतात. या आजार आणि संकटांचा सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालय सज्ज झाले आहे. ठाणे जिल्हा सागरी, डोंगरी, पठारी आणि दुर्गम आदिवासी भागात विभागला आहे. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात अनेक नद्या आणि धरणे आहेत. या धरणातून ठाण्यासह मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या आणि जुन्या जलवाहिन्या ठाण्यातून जातात. त्यामुळे त्या फुटण्याचा धोका आहे. तसेच धरणे, नद्यांना पूर येण्याची भीतीही असते. डोंगराच्या पायथ्याशी नागरी वसाहती आहेत. तेथे दरडी कोसळून मोठी हानी होण्याची शक्यता असते. शिवाय जिल्ह्यात वागळे, अंबरनाथ, ऐरोली अशा एमआयडीसी आहेत. तेथेही गॅस गळती, विषारी वायू गळती आणि इतर अपघात होण्याची शक्यता असते. समृद्धी, यशवंतराव चव्हाण द्रुतगती, नाशिक, अहमदाबाद असे महामार्ग जातात. या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतात. अशावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी लागते. त्याचा आढावा डॉ. पवार यांनी ऑनलाईन बैठकीत घेतला. तसेच याबाबत साधने, औषधांची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले.

आपत्तीचा धोका
पावसाळ्यात नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. गेल्यावर्षी समृद्धी महामार्गावर पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. तेथे जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने चांगली कामगिरी केली होती.
कावीळ, हगवण, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरियासारखे व इतर साथ आजार तसेच चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, भूस्खलन, पूरजन्य परिस्थिती, सर्प व विंचू दंश यांसारख्या घटना घडतात. हे धोके लक्षात घेऊन रुग्णालयात औषधे, गोळ्या, खाटा, रुग्णवाहिका सज्ज असणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन आरोग्यविषयक ऑनलाईन बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही चांगल्या गोष्टी सुचवल्या होत्या. यासोबतच रुग्णालयात आरोग्यविषयक मॉकड्रिल घेण्याचे सुचवले आहे. त्यामुळे भूस्खलन, पूरजन्यस्थितीत एखादे मॉकड्रिल घेण्याचा विचार आहे. कोणतेही संकट आले तर आमची आरोग्य टीम नेहमी सज्ज असते. या बैठकीच्या माध्यमातून सगळ्यांचा पुन्हा एकदा आढावा घेतला असून सगळ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्‍हिल रुग्णालय, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com