चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया!

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया!

मुंबई, ता. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने ॲप आणि पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मतदारांना मतदान सहजतेने करता यावे, यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


कसे शोधावे मतदार यादीत नाव?
मतदारांनी VOTERS SERVICES PORTAL (eci.gov.in) या लिंकवर जाऊन अथवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले मतदान केंद्र, यादी क्रमांक शोधता येणार आहे किंवा स्वत:बद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरून तुम्ही तुमचे मतदान केंद्र शोधू शकता. तसेच तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांकाद्वारेही तुमचे मतदान केंद्र आणि यादी क्रमांक शोधू शकता. तसेच व्होटर हेल्पिंग ॲपद्वारेही तुम्ही मतदान केंद्र आणि यादी भागविषयी माहिती मिळवू शकता.

व्होटर आयडीसह १२ ओळखपत्रे वैध
मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ट दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/ राज्य सरकार/ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदानादिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.
...
मतदारांना भरपगारी सुटी
जिल्ह्यातील सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी असणार आहे. सुटी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुटी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.
..
कुठे साधाल संपर्क?
मतदार सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच, आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेता येणार आहे. सक्षम ॲप दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास सी-व्‍हिजिल ॲपवर तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com