डहाणूला अवकाळीने झोडपले

डहाणूला अवकाळीने झोडपले

कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, गवत व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला.

हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते.

सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली.

उन्हाळी भातकापणी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिके कापून शेतात सुकण्यासाठी ठेवली होती; पण अचानक आलेल्या या पावसाने शेतात पाणी साचून भातपिके भिजून गेली. त्याचप्रमाणे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका दरवेळी वीटभट्टीचालक, तसेच गवत पावली व्यावसायिकांना बसतो. यामुळे हा व्यवसाय पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत होता; पण आता नुकसानीच्या भीतीने या धंद्यात उतरण्यास कोणी तयार होत नाही.

तलासरीमध्ये गारांचा पाऊस
तलासरीतील कोचाई गावात वादळी वारा, गारांचा पाऊस पडला. यामुळे अजय छोटू हाडल यांच्या घराचे छप्पर उडाले. पावसाळ्यापूर्वी घराचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे. तसेच धानिवरी येथे एका घरावर झाड पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत.

सूर्या प्रकल्पाच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर उन्हाळी भातपीक चांगले आले होते. चार दिवसांपूर्वीच कापणीला सुरुवात केली होती; पण हे पीक अवकाळी पावसाने भिजवून टाकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- जयराम तांडेल, शेतकरी

दरवेळीच्या नुकसानीमुळे वीटभट्टीचा व्यवसाय करावा की नाही, हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण अवकाळी पाऊस हा कधी पडेल सांगता येत नाही. त्यामुळे बेभरवशाच्या वातावरणामुळे पारंपरिक वीटभट्टी, तसेच गवत पावली या धंद्यावर उदरनिर्वाह करत होतो; पण आता नुकसानीमुळे काय करावे, हा आमच्यापुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
- विष्णू बरफ, वीटभट्टी मालक

सोमवारी अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी भातशेती, वीटभट्टीचे नुकसान झाल्याचे समजते. त्याचबरोबर तीन ते चार घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. महसूल विभाग, तसेच कृषी विभागाकडून पाहणी केली जाईल.
- अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com