परप्रांतीय मते ठरणार हुकमी

परप्रांतीय मते ठरणार हुकमी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे जिल्ह्यात येणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असा सूचक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभेत दिला. ही सभा कल्याण व ठाण्याच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असली, तरी ठाकरे यांच्या भाषणामुळे परप्रांतीयांची मते हातची जाणार असल्याची भीती वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा आहे. ठाण्याचा विचार केल्यास येथे ४५ टक्क्यांहून अधिक बहुभाषिक आहेत. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातही उत्तर भारतीय, मुस्लिम, सिंधी, मल्याळी, तामिळ, गुजराथी, मारवाडी समाजाचे मतदार तितक्याच संख्येने आहे. त्यामुळे या हुकमी मतांवर आता पाणी पडण्याची चिंता उमेदवारांना सतावत आहे.
शिवसैनिकांना १८ वर्षांनंतर राज ठाकरे यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार म्हणून रविवारी सभेची उत्सुकता शिगेला पोहचली होती. कळव्यात हजारो नागरिक ही सभा ऐकण्यासाठी उपस्थित होते. ठाकरे काय बोलणार, याकडे उमेदवारांसह श्रोत्यांचेही लक्ष होते; पण त्यां‍नी पहिलांच बॉम्ब परप्रांतीयांवर टाकून खळबळ उडवून दिली. राज्यात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे असल्यामुळे येथे पाच महापालिका आहेत. ही लोकसंख्या इथली मुळची नाही. राज्यात येणारा परप्रांतीय ठाण्यात स्थायिक होत असल्यामुळे धोका वाढला आहे. त्यामुळे कितीही विकास कामे करा, लोंढे थांबवले नाही तर विकासाचा विस्फोट होईल, असे ते म्हणाले. त्यांचा मुद्दा वस्तुस्थितीला धरूनच आहे. पण, ऐन मतदानाच्या तोंडावर एकीकडे उमेदवार परप्रांतीय मतदारांना कुरवाळत असताना त्यांच्या या भाष्याने ही व्होट बँक घटण्याची शक्यता बळावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंंदे यांनी विविध उपक्रम राबवून संबंधित समाजाचा पाठिंबा मिळवला आहे; पण आता राज ठाकरे यांच्या भाषणामुळे बहुभाषिक मतदारांची मने दुखावल्याचे चित्र आहे. विशेषत: कळवा-मुंब्रामधूनच डॉ. शिंदे यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कळव्यात उत्तर भारतीय, तर मुंब्य्रात मुस्लिम समाज सर्वाधिक आहे. त्यात मुंब्य्रातील दहशतवादाचा उल्लेख झाल्याने ही एक गठ्ठा मते फिरणार हे आता निश्चित झाले आहे.


बहुभाषिकांचा ठाणे मतदारसंघ
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथील मिरा-भाईंदर या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक गुजराती, मारवाडी समाज आहे. सर्वाधिक मतदार असलेल्या ओवळा- माजिवाड्यात उत्तर प्रदेशचे रहिवासी अधिक आहेत. कोपरी-पाचपाखाडीतही उत्तर भारतीय समुदाय वाढला आहे. ठाणे शहरात उत्तर भारतीय, गुजराती, पंजाबी, मुस्लिम समाज स्थायिक आहे. ऐरोली, बेलापूर मतदारसंघातही भूमिपुत्रांच्या संख्येपेक्षा जास्त इतर भाषिक समाजाची लोकवस्ती वाढली आहे. या सर्व भाषिकांच्या मतांची मोट बांधण्याचे काम महायुती व महाविकास आघाडीकडून सुरू आहे.

कल्याणमध्ये मतांचा गठ्ठा वाढवण्याचा प्रयत्न
कल्याण लोकसभा मतदारसंघातही मराठी टक्का घसरत आहे. उल्हासनगरला सिंधी समाजाचे प्राब्ल्य आहे. डोंबिवलीत सर्वाधिक मराठी भाषिक असले, तरी मल्याळी, तामिळ, गुजराती, मारवाडी समाज अनेक वर्षांपासून स्थायिक झाला आहे. कल्याणमध्ये उत्तर भारतीय, मुस्लिम समाज आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात सर्वाधिक उत्तर भारतीय, मुस्लिम आहेत. कल्याण ग्रामीणचीही तिच स्थिती आहे. उद्धव ठाकरे यांना मराठी जनमानसातून सहानुभूती आहे. त्यामुळे मराठी टक्क्यांचे विभाजन होणार हे अटळ आहे. अशा स्थितीत मतांचा गठ्ठा वाढवण्यासाठी महायुतीचे उमेदवार बहुभाषिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते.

मतदार किती आणि कोणत्या समाजाचे
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण २४ लाख ९ हजार ५१३ मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये मराठी भाषिक निम्मे म्हणजे १३ लाखांच्या आसपास आहेत. उत्तर भारतीय समाजाचे मतदार साडेपाच लाखांच्या घरात आहेत. मुस्लिम ३ लाख, गुजराती पावणेदोन लाख, पंजाबी-सिंधी ५० हजार, तर इतर भाषिक ४५ हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com