दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांचा मतदान केंद्राचा प्रवास सुकर

दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांचा मतदान केंद्राचा प्रवास सुकर

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १४ : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर निवडणूक प्रशासनाने दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी मागणी सक्षम ॲपवर नोंदवावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना संबधित सुविधा पुरविणाऱ्या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहायक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे यादव यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशीपर्यंत सक्षम ॲपवर दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना मागणी नोंदविता येणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे यादव यांनी सांगितले.
मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची जोरदार तयारी सुरू आहे.

हेल्पलाईन, व्हिडीओ कॉल सुविधा
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडून १९५० हा हेल्पलाईन क्रमांक; तर  ०२२-२४१८३१४४ / ७०३९२९७१९७ हे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच कर्णबधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातील दिव्यांग मतदार सुविधेसाठीचे नोडल अधिकारी सुनीता मते यांनी दिली.
--------
मतदान केंद्रांवर सुविधा
मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरही दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगांमध्ये बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आवश्यकतेनुसार व्हिलचेअर, सहाय्यक स्वयंसेवक विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे. मेडिकल किट, माहितीचे फलक, कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधणारे स्वयंसेवक, दृश्य माहिती, ब्रेललिपीतील सूचना आदी सुविधा देण्यात येणार आहेत. अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतदार स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सर्व मतदान केंद्रावर अंध मतदारांकरिता ब्रेल लिपीतील डमी मतदानपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदार/वृद्ध मतदार व त्यांच्या सहायकास मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता व्हिलचेअर फ्रेंडली वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com