मनसेच्या मैदानावर महायुतीची बॅटिंग

मनसेच्या मैदानावर महायुतीची बॅटिंग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मनसेने मिळवलेल्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीच्या प्रचाराची संयुक्त समारोप सभा होणार आहे. १७ मेच्या या संयुक्त प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकत्रित संबोधित करणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगताही याच दिवशी बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत.

राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात झाली आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा जागांवर मतदान होत आहे. नरेंद्र मोदी यांची मुंबईतील एकमात्र सभा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. महाविकास आघाडीने आपल्या प्रचाराचा बिगूल याच मैदानावर फुंकला होता. या वेळी हे मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुक केले आहे. त्यामुळे मनसे, शिवसेनेच्या परंपरागत मैदानावर महायुतीचा प्रचाराचा समारोप होईल.
---
कोण बोलणार?
नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत राज्यात झालेल्या सभेत एखाद दुसरा अपवाद सोडला तर इतर नेत्यांना बोलू दिले जात नाही. या सभेत मात्र पंतप्रधानांच्या उपस्थितीत राज ठाकरे बोलणार आहेत. जाहीर सभेत एकमेकांसमोर बोलण्याचा कदाचित हा पहिला प्रसंग असेल. मुंबईत मोदी यांच्या आगमनाचे स्वागत करणाऱ्यांमध्ये या वेळी मनसे नेत्यांचीही नावे आहेत. या सभेत राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अधिक कडवट आणि आक्रमक बोलणार असल्याची दाट शक्यता आहे.

सभेची जय्यत तयारी
शिवाजी पार्क मैदानावरील सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. भाजप, शिवसेना (शिंदे) गटासह मनसेकडूनही गर्दी जमवण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मनसेकडून विभाग आणि शहप्रमुखांना कार्यकर्ते आणण्यासाठी बसचे निर्देश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना ऐकायला लोक येतात. सोबत नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे भाषण ऐकणाऱ्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. मुंबईत भाजप, शिवसेनेसाठी वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने या सभेकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे दीड लाख लोकांची क्षमता असलेल्या बीकेसी मैदानावरची सभा यशस्वी करण्याचे नियोजन महाविकास आघाडीकडून सुरू आहे. हे मैदान ओसंडून वाहावे, या रीतीचे नियोजन तिन्ही पक्षांचे आहे. राहुल गांधी यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सभेला उपस्थित राहणार आहेत.
---
केजरीवाल, मोदींचा रोड शो
सभेपूर्वी नरेंद्र मोदी यांचा रोड शो करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही रोड शो करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com