वादळी पावसामुळे फळगळती

वादळी पावसामुळे फळगळती

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : उशिराने आलेला आंब्‍याची काढणी सुरू असतानाच आलेल्या वादळी पावसाने बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. बदलत्या वातावरणामुळे, जिल्‍ह्यात काही ठिकाणी यंदा फेब्रुवारीमध्ये आंब्‍याला मोहर आला होता. फळधारणेनंतर वाढही जोमात होत होती, मात्र सोमवारी आलेल्या वादळा पावसाने फळ गळती झाली.
यंदा आंब्‍याचे उत्‍पादन जेमतेम ४० टक्केच झाले होते. त्यात वातावरणातील बदलाचा फटका सातत्याने बसत आहे. सुरुवातीला कडाक्याची थंडी आणि एप्रिलमध्ये उष्‍मालाटेमुळे फळधारणा व्यवस्‍थित झालीच नाही, असे येथील आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. या सर्व संकटांवर मात करून शिल्लक राहिलेली फळे मंगळवारच्या वादळी पावसात गळून पडली. उशिराने फळधारणा झालेली फळे साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यायोग्य होतील, असा अंदाज होता.
रोहा, श्रीवर्धन येथील बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडावर तयार होत असलेली ८० टक्के फळे खराब झाली आहेत. आता यापुढे बाजारात येणाऱ्या आंब्याची आवकही कमी होणार असल्याने त्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पिकवण्यासाठी काढलेली फळे सुरक्षित आहे. ती फळे व्यवस्थित पिकवण्याकडे आता बागायतदारांचे लक्ष राहणार आहे.
कर्जत, खालापूर, पेण अलिबाग तालुक्‍यांमध्‍ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह धुळीचे लोट वाहत होते. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला असून महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी करीत आहेत.

१५ मेपर्यंत यलो अलर्ट
जिल्‍ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण होते. महाड, पोलादपूरमध्ये शनिवारी (ता.११) तर सोमवारी (ता.१३) जिल्‍ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. संध्‍याकाळी आलेल्‍या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईसह, कोकण आणि कोल्‍हापूरमध्ये अवकाळीचा अंदाज वर्तवण्‍यात आला होता. रायगड जिल्‍ह्यात हवामान खात्‍याने १५ मेपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसतो आहे.

उन्हाळी भातपिकाचे नुकसान
रायगड जिल्‍ह्यात मेच्या मध्‍यावर आंबा पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा अवेळी आलेल्‍या पावसाने आंबा पिकाच्या उत्‍पादनावर परिणाम झाला आहे. त्‍यातून शिल्‍लक राहिलेल्‍या आणि काढणीला आलेल्‍या आंब्‍याला वादळी पावसाचा फटका बसला आहे. तयार झालेला आंबा गळून पडला आहे. माणगाव, रोहा भागात कापणी होत असलेल्‍या उन्‍हाळी भातपिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टी व्‍यवसायालाही अवकाळीचा फटका बसला आहे.

-------------

आंबेनळी घाटातील चिरेखिंडीत झाड कोसळले
पोलादपूर (बागायतदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये सोमवार सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वाहतुकीसाठी मुख्य मानल्‍या जाणाऱ्या आंबेनळी घाटात चिरेखिंड गावाच्या हद्दीत पोलादपूर-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास मोठे झाड कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झाडाचा काही भाग बाजूला करून वाहतूक एका बाजूने सुरू करण्यात आली तर झाडाचा मोठा भाग बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
माणगाव तालुक्‍यात शनिवारी (ता.११) सायंकाळी धुलीकणांचे वादळ उठले होते, त्‍यानंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. त्‍यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तीन दिवसांपासून दुपारपर्यंत उष्‍मा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण, पाऊस हजेरी लावत असल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी वितरित होणारे काळनदीचे पाणी सध्या आटले आहे. मात्र अचानक आलेल्‍या पावसामुळे धूळमिश्रित पाणी मिसळल्‍याने नदीचे पाणी गढूळ झाले आहे.

आरोग्‍याच्या समस्‍या उद्‌भवण्याची शक्‍यता
अवकाळी पावसाने तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर पिकणाऱ्या उन्हाळी भात शेतीसह आंबा, फणस, कोकम फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. वीटभट्ट्या, भाजीपाल्‍याचे पिकाचेही नुकसान झाले आहे. हवामान बदलामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्‍यता असल्‍याने नागरिकांनी पाणी गाळून, उकळून प्यावे, असा सल्‍ला डॉक्‍टरांकडून दिला जात आहे.
------------

पेण, वरसईत धुळीचे लोट
पेण, ता. १४ (वार्ताहर) : हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार, सोमवारी दुपारपासूनच पेणमध्ये कमालीचा उकाडा जाणवत होता. या उकाड्यातच सायंकाळी तालुक्यातील वरसई, कामार्ली, हमरापूर या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रस्त्यावर धुलिकण, झाडांचा पालापाचोळा उडत असल्याने चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. दरम्यान विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात होताच, वीज गायब झाली. पावसाने अचानक हजेरी लावल्‍याने नागरिकांची तारांबळ उडाली. हवामानात बदल होऊन थंडावा निर्माण झाला होता. पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा पीक, वीटभट्टीसह इतर व्यावसायिकही हतबल झाले. तर शहरातील उत्कर्षनगर येथे झाड कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.

-------------

वासांबे-मोहोपाड्यात वीज खंडित
रसायनी, ता. १४ (बातमीदार) : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वासांबे-मोहोपाडा परिसरात सोमवारी सुमारे तीन तास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. दुपारी सव्वाचारच्या सुमारास धुळीचे वादळ उठले, त्‍यानंतर अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. कामगार वसाहतीत जनता विद्यालयाजवळील रस्त्यावर एक झाड उन्मळून पडले. एमआयडीसीच्या अग्‍निशमन पथकाने झाड हटवून रस्ता मोकळा केला. तांत्रिक बिघाड आणि एचओसी कॉलनीत वीज वाहिन्यांवर फांद्या पडल्याने पुरवठा खंडित झाला होता.
वासांबे-मोहोपाडा वीज महावितरण कार्यालयाअंतर्गत चांभार्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा आणि एमआयडीसीतील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्‍याने नागरिकांची गैरसोय झाली. साडेसातच्या सुमारास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्‍यानंतर पुरवठा पूर्ववत झाला. वीजेअभावी सुमारे तीन नागरिकांची गैरसोय झाली आणि एमआयडीसीचा पाणी पुरवठाही बंद होता.

वैरणीला चांगला भाव
रसायनी परिसरात दुबार भात कापणी आणि झोडपणीचे काम संपत आली आहे. यंदा खरीप हंगामात परतीच्या, अवकाळी पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे दुबार हंगामातील वैरणीला (पेंढा) मागणी वाढली आहे. उन्हाळी भात पिकाच्या कापणीची आणि त्यानंतर झोडपणीची काम ज्या शेतकऱ्यांची झाली आहे, त्यांनी वैरणीची विक्री सुरू केली असून शेकडा सुमारे १,३०० रुपये भाव मिळत असल्‍याचे महेंद्र धुरव या शेतकऱ्याने सांगितले.

रसायनी ः

................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com