अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुराळा

अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुराळा

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १४ : पालघर लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. पालघरची ही निवडणूक बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नियमित हजेरी लावत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघरमध्ये सभा घेऊन विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तर बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शहरी, बंदरी आणि डोंगरी भाग पिंजून काढला आहे. त्यामुळे पालघर निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, कल्याण, मुंबई, नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघात अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे. पालघर लोकसभेचे मतदान २० मे रोजी होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. आठवडाभरात जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावून सभा घेतल्या आहेत. शहरी भागासह दिग्गज नेते आणि उमेदवार ग्रामीण भागात प्रचारासाठी फिरत आहेत. पालघर लोकसभेचे बविआ, भाजप आणि शिवसेनेने प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात नालासोपारा, बोईसर आणि वसई हे विधानसभा क्षेत्र जास्त मतदार संख्या असलेले आहे. सुरुवातीला या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले होते. आता अखेरच्या टप्प्यात पालघर, डहाणू आणि विक्रमगड या विधानसभा क्षेत्रात उमेदवार आणि नेत्यांनी मोठ्या सभा, चौक सभा, काॅर्नर सभा; तसेच रॅली काढून प्रचाराचा धुराळा उडवला आहे.
प्रचारात वाढवण बंदर हा कळीचा मुद्दा ठरला आहे. मतदारसंघातील शहरी भागात पर्यावरणाचा प्रश्न, वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्था, औद्योगिकीकरण, रेल्वे मार्गाची संख्या वाढवणे, रेल्वे स्थानकांचे सुसज्जीकरण, कामगारांचे प्रश्न या शहरी भागातील प्रश्न आणि समस्या आहेत. सागरी भागात मच्छीमारांचे प्रश्न व समस्या तशाच आहेत. आदिवासी ग्रामीण भागात पाण्याची समस्या, रोजगार, स्थलांतर, कुपोषण, माता आणि बालमृत्यू; तसेच आरोग्य व्यवस्थेची समस्या आजही कायम आहेत. या समस्या सोडवण्याचे मोठे आव्हान खासदारांसमोर असणार आहेत. सद्यस्थितीत विरोधी पक्षनेते याच विषयाला धरून प्रचाराचे मुद्दे मतदारांपुढे मांडत आहेत. महायुती मोदी सरकारने केलेली कामे; तसेच आगामी काळात विकसित भारताचे व्हिजन मतदारांपुढे मांडत आहेत. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्याने ही निवडणूक सर्वांसठी प्रतिष्ठेची बनली आहे.

भाषणाच्या तोफा धडाडणार
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या सभा मतदारसंघात होणार आहेत. प्रचाराचे चारच दिवस शिल्लक आहेत. त्यांच्या भाषणाच्या तोफा धडाडणार आहेत. अनेक मुद्द्यांवर विकासाचे गाजर दाखवले जाणार आहे. या दरम्यान नेतेमंडळी, उमेदवार एकमेकांवरील चिखलफेकही पालघरमधील मतदारांना बघायला मिळणार आहे.

विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार संख्या
१) डहाणू - २ लाख ८३ हजार ४१९
२) विक्रमगड - ३ लाख १ हजार ९६४
३) पालघर - २ लाख ८२ हजार ६८६
४) बोईसर - ३ लाख ८४ हजार २३३
५) नालासोपारा - ५ लाख ५७ हजार ६७१
६) वसई - ३ लाख ३८ हजार ५४१
एकूण मतदार - २१ लाख ४८ हजार ५१४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com