ट्रान्सहार्बरवर नव्या लोकलची प्रतीक्षा

ट्रान्सहार्बरवर नव्या लोकलची प्रतीक्षा

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर अनेक वर्षांपासून नव्या कोऱ्या लोकलची प्रतीक्षा आहे. जुन्या आणि नादुरुस्त लोकल चालविण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकदा काही लोकलमधील पंखे आणि लाईट बंद अवस्थेत असल्याने भर उन्हाळ्यात प्रवाशांना घाम फुटत असून प्रवाशांचा श्वास कोंडला जात आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली.
ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. ठाण्याहून नेरूळ, खारघर, पनवेलकडे शिक्षणासाठी आणि कामासाठी येणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सकाळ, संध्याकाळच्या वेळी गच्च भरलेल्या असतात. नेरूळवरून निघालेली ठाणे लोकल कोपरखैरणे स्थानकात पोहोचेपर्यंत भरून जाते. त्यामुळे कोपरखैरणे स्थानकातून लोकलमध्ये चढणाऱ्यांना धक्के मारत आत शिरावे लागते. तसेच, बऱ्याचदा उभ्यानेच ठाणे स्थानकापर्यंत जावे लागते. हीच परिस्थिती वाशीवरून ठाण्याला जाणाऱ्या लोकलची आहे. पनवेलमध्ये जाण्यासाठीही प्रवाशांना वाशीवरून उभ्यानेच प्रवास करावा लागतो.
ट्रान्सहार्बर मार्गावर लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील धावणाऱ्या लोकलवर प्रवाशांचा ताण येत आहे. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि जुन्या लोकल गाड्यांमुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

देखभाल दुरुस्तीअभावी प्रवाशांचे हाल
ट्रान्सहार्बर मार्गावर एक रेट्रो फिट लोकल कधी कधी धावते. ही लोकल जुन्या पद्धतीची असून त्यांचा वेग कमी आहे. तसेच या गाड्यांमधील आसनव्यवस्था, प्रकाश योजना, अंतर्गत जागा कमी असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लोकल गाड्यांची योग्य दुरुस्ती न केल्याने धावत्या लोकलचे पंखे बंद होणे, अर्ध्यात डब्याची लाईट जाण्यासारखे प्रकारसुद्धा घडत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.
--------------
लोकल फेऱ्यांचे गणित?
सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १६० लोकल गाड्या असून दररोज १३६ लोकल गाड्या धावतात. दररोज या गाड्यांच्या एक हजार ८१० फेऱ्या होतात. यामध्ये मेन लाईनवर ८९४, हार्बर मार्गावर ६१४, ट्रान्सहार्बर मार्गावर २६२ आणि नेरूळ बेलापूर- खारकोपर विभागात ४० लोकल फेऱ्या दररोज धावत आहेत.
--------------------------


मध्य रेल्वेकडून नेहमीच ट्रान्सहार्बरवासीयांना सापत्न वागणूक दिली जाते. आयुर्मान संपलेल्या जुन्या, लोकल गाड्या मुख्य मार्गावरून काढून हार्बर मार्गावर चालविल्या जात आहेत. त्यानंतर ट्रान्सहार्बर चालविण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या लोकल द्याव्यात.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
------
सर्वात जुन्या झालेल्या लोकल ट्रेन नवी मुंबईच्या वाटेला आल्या आहेत. ही सापत्न वागणूक नाही का? लोकल तिकीट दर सर्व लोकलचे समान आहे. त्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील चांगल्या लोकल चालवाव्यात, तसेच लोकल फेऱ्यांत वाढ करावी.
- पिंकी राणे, प्रवासी
------
नवीन लोकल फक्त पश्चिम रेल्वेवर चालू केली जाते; परंतु हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकही नवीन लोकल चालू झालेली नाही. प्रवासी संख्या वाढत असताना रेल्वेने याकडे लक्ष द्यायाला हवे.
- बाळू मोहिते, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com