भाजपमध्ये पुन्हा नाराजी

भाजपमध्ये पुन्हा नाराजी

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : निवडणुकीचा जाहीर प्रचार करण्यासोबतच उमेदवाराची वैयक्तिक आणि कार्याची माहिती देणारी प्रचारपत्रके घरोघरी वाटली जात असतात. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा परिचय देणारी प्रचारपत्रके घरोघरी वाटली जात आहेत. मात्र, या पत्रकांवर भाजपचे स्थानिक नेते व माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे छायाचित्रच नसल्याने मेहता समर्थकांमध्ये पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली आहे. झालेली चूक लक्षात येताच शिंदे गटाकडून परिचय पत्रके पुन्हा छापण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी त्यांची परिचयपत्रके घरोघरी वाटण्याचे काम कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या पत्रकात म्हस्के यांचा वैयक्तिक परिचय आणि केलेल्या कामांची माहिती नमूद केली आहे. या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सर्व स्थानिक नेत्यांची छायाचित्रे झळकत आहेत. मात्र, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना मात्र या पत्रकावर स्थान दिलेले नाही. यामुळे मेहता यांना प्रचारात डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. परिणामी, भाजपमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याआधीही ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी म्हस्के यांच्या उमेदवारीवरून मिरा-भाईंदरमधील भाजपच्या मेहता गटामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या मतदारसंघात भाजपलाच उमेदवारी मिळावी, यासाठी सर्वप्रथम मेहता गटाने प्रदेश पातळीवर मागणी केली होती. उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक पातळीवर भाजप प्रचारात सक्रिय झाली. आता म्हस्के यांच्या परिचय पत्रकावरून भाजपमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य सुरू झाले आहे.


परिचयपत्रकावर माझे छायाचित्र असणे अथवा नसणे ही गोष्ट फारशी महत्त्वाची नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व्हावेत, हे एकमेव उद्दीष्ट घेऊन भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत.
- नरेंद्र मेहता, माजी आमदार, भाजप

परिचयपत्रकावर सर्वांची छायाचित्रे छापण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर मेहता यांचे छायाचित्र नजर चुकीने राहून गेले आहे. मात्र, ही बाब लक्षात येताच तातडीने चूक सुधारून मेहता यांच्या छायाचित्रासह पत्रके छापण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com