सावरशेतच्या पुनवर्सनाचा प्रस्ताव धुळखात

सावरशेतच्या पुनवर्सनाचा प्रस्ताव धुळखात

खर्डी, ता. १४ (बातमीदार) : भातसा धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सावरशेत गावातील अनेक घरांत दरवर्षी पावसाचे व धरणाचे पाणी शिरत असल्याने येथील जनजीवन विस्कळित होते. धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाहामुळे दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूर्ण गाव पाण्याने वेढले जात असल्याने काही घरे वाहून जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात सावरशेत गावाचा संपर्क पावसाळ्यात तुटतो. त्यामुळे येथील काही रहिवासी आपला जीव वाचविण्यासाठी इतरत्र आसरा घेतात. २०१९च्या ऑगस्टमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या पाण्याने गाव वेढले होते. त्यावेळी तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासमवेत तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना येथील पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते; परंतु साडेतीन वर्षांनंतरही यासंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. सावरशेतचा प्रस्ताव लालफीतीत अडकल्याने यंदाच्या पावसाळ्यातही गावकऱ्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावरशेत गावकऱ्यांची पुनर्वसनाची मागणी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणली होती. त्यानंतर पाटबंधारे खात्याने या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्तावही केल्याचे सांगितले होते, मात्र साडेतीन वर्षे उलटून गेली तरी कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. २०१६ पासून सावरशेत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी जलसंधारण व महसूल विभागाकडे येथील रहिवाशांनी केली होती; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

नातेवाइकांकडे आसरा
सावरशेत गावात ५५ घरे असून अंदाजे ३५० लोकसंख्या आहे. धरणाच्या पायथ्यालगत गाव असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर संपूर्ण गाव पाण्यात जाते. त्यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. तसेच पूरस्थितीमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे येथील रहिवासी पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहतात. तर काही इतरत्र नातेवाइकांकडे राहायला जात असतात.

गेल्या साडेतीन वर्षांपासून सावरशेत गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव रखडल्याने आम्हाला पावसाळ्यात पाणी कधी वाढेल व कधी पूर येईल, अशी टांगती तलवार असल्याने जीव मुठीत धरून जगावे लागत आहे, त्यामुळे शासनाने आमच्या गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे.
-कुमार भोईर, स्थानिक रहिवासी


सावरशेतच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर असून पाठपुरावा सुरू आहे.
-रवींद्र पवार, उपकार्यकारी अभियंता, भातसा धरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com