स्ट्रक्चरल ऑडिटची पडताळणी यंत्रणेचा अभाव

स्ट्रक्चरल ऑडिटची पडताळणी यंत्रणेचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता ठाणे पालिकेनेदेखील शहरातील होर्डिंग्जची झाडाझडती सुरू केली आहे. त्यात होर्डिंग्ज मालकांकडून स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असले तरी, होर्डिंग्ज मालकांकडून करण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटची पडताळणी करण्याची यंत्रणाच पालिकेकडे नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे महापालिकेने ठरवून दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे तब्बल ९० होर्डिंग्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोमवारी (ता. १३) सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील एक भले मोठे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबईसह ठाणे पालिकादेखील अलर्ट मोडवर आली आहे. ठाणे शहरात आजच्या घडीला ३००च्या आसपास होर्डिंग्ज आहेत. या होर्डिंग्जच्या मालकांना २४ एप्रिल २०२४ रोजी महापालिकेच्या जाहिरात विभागाने पत्र पाठवून स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल तत्काळ महापालिकेच्या दप्तरी दाखल करण्यास सांगितले. मात्र, अद्यापही कोणीच माहिती सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे होर्डिंग्ज मालकांकडून करण्यात येणाऱ्या ऑडिटची महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची पडताळणी केली जात नाही. त्यामुळे शहरातील किती होर्डिंग्ज धोकादायक आहेत, याची माहिती मिळू शकत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत आणि अनाधिकृतरीत्या विविध ठिकाणी जाहिरातींचे मोठे होर्डिंग्ज लावले जात आहेत. दुसरीकडे अधिकृत जाहिरातदारांनीदेखील महापालिकेची कशी फसवणूक केल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. महापालिकेने ज्या ठिकाणी ४० बाय २० चौरस फूट मंजुरी दिली. त्याठिकाणी प्रत्यक्ष मोजमाप केले असता ४० बाय ४० चौरस फूट आकाराचे दिसून येत आहे. असाच प्रकार इतर ठिकाणीदेखील दिसून आला आहे. त्यानुसार कळवा प्रभाग समितीत एक, वागळेमध्ये दोन, दिवा चार, वर्तकनगर ११, माजिवडा मानपाडा ४३, नौपाडा चार, उथळसर प्रभाग समितीत चार ठिकाणी अशा तफावती आढळल्या आहेत. मुंबईतील दुर्घटनेनंतर पालिकेने आता अशा जाहिरातदारांच्या विरोधात नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे; मात्र नोटिसा बजावूनदेखील मोठ्या आकाराच्या होर्डिंग्ज काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

अवमान याचिका दाखल करणार
दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनीदेखील मोठ्या आकाराच्या जाहिरातदारांच्या विरोधात तसेच ज्यांनी महापालिकेचा कर बुडविला आहे, अशांच्या विरोधात तसेच महापालिकेने त्यांच्याकडून कर वसूल न केल्याने महापालिका आणि संबंधित जाहिरातदारांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.

अद्यापही कारवाई नाही
ठाणे पालिका क्षेत्रात परवानगीपेक्षा आकाराने मोठ्या होर्डिंग्ज लावल्याने ते अनधिकृत ठरत असल्याचे पालिकेने नोटीसमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर पुढील ४८ तासांत जाहिरात फलकाचे आकारमान कमी करावे, तसेच विहित मुदतीत प्रशासन शुल्क न भरल्यास त्या कालावधीत वाढीव मोजमापाची जाहिरात फी व पाच पट प्रशासन शुल्काचा भरणा करावा, तसेच आपले जाहिरात फलक नियमित करून न घेतल्यास जाहिरात फलक परवानगी रद्द करण्यात येईल, असेही नमूद केले आहे; परंतु ही नोटीस देऊन सुमारे सहा महिने उलटले आहेत. त्यानंतर अद्यापही त्यावर कारवाई झालेलीच नसल्याचे आता दिसून आले आहे.

बुडवला पालिकेचा कर
मोठ्या आकाराच्या होर्डिंग्जवाल्यांनी पालिकेचा आतापर्यंत १० कोटींचा जाहिरात कर बुडविला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात दुसरीकडे ८५ टक्के जाहिरातदार कोर्टात गेले आहेत. जीएसटी लागू झाल्याने आम्ही महापालिकेचा जाहिरात कर भरणार नाही, या आशयाची याचिका दाखल आहे; परंतु न्यायालयानेदेखील जुन्या दराने जाहिरात कर भरावा, असे सांगितले आहे, मात्र तरीदेखील अद्यापही तो कर संबंधित जाहिरातदारांनी भरलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com