रेल्वे बुकिंग, खरेदी व्यर्थ

रेल्वे बुकिंग, खरेदी व्यर्थ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या सचिन यादवने पेट्रोल पंपावर काम करून संसाराची घडी बसवली होती. उत्तर प्रदेशात घरी चार महिन्यांचे बाळ, पत्नी, आई-वडील आणि दोन लहान भाऊ यांची त्याच्यावर जबाबदारी होती. तो न चुकता दर महिन्याला गावाला आपल्या आई-वडिलांना पैसे पाठवायचा. मंगळवारी (ता. २१) तो गावी जाणार होता. त्याने रेल्वेचे तिकीट बुक केले होते. घरच्यांसाठी खरेदीही केली होती. गावी जायचे म्हणून आनंदात असलेल्या सचिनचा सोमवारी घाटकोपर येथील दुर्घटनेत मृत्यू झाला आणि त्याची गावी जाण्याची तयारी व्‍यर्थ ठरली. एकमेव कमावता असलेल्या सचिनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याच्यशिवाय जगायचे कसे, असा आर्त सवाल त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असलेला सचिन यादव हा दोन वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आला होता. सध्या तो सायन कोळीवाडा येथे वास्तव्याला होता, अशी माहिती त्याचे काका अरविंद यादव यांनी दिली. उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ घरी २५ मेपासून श्रीमद भागवत कार्यक्रम असल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला आणि बाळाला आधीच गावी पाठवले होते. अनेकांना निमंत्रण दिले असून जेवणाचीही व्यवस्था केली आहे. त्यानेही २१ तारखेचे बुकिंग केले असल्याने घरी आवश्यक असलेल्या सामानाची खरेदी केली होती. दरम्यान, आज सकाळीच तो नेहमीप्रमाणे कामावर गेलेला असतानाच वादळी वाऱ्याने कोसळलेल्या होर्डिंगखाली दबून त्याचा मृत्यू झाल्याचे अरविंद यादव यांनी सांगितले.
------------------
भावांच्या शिक्षणाची जबाबदारी
सचिन घरातील सर्वात मोठा असून तोच एकटा कमावता होता. आजारपणामुळे वडिलांना फारसे बाहेर जाता येत नाही. त्यामुळे घराचा गाडा आणि दोन लहान भावांच्या शिक्षणाचा खर्च सचिनच आपल्या पगारातून कसाबसा करायचा. त्यासाठी अनेकदा तो पेट्रोल पंपावर जाता तास काम करायचा. मात्र आता तोच रहिलेला नाही. त्यामुळे भावांचे शिक्षण कसे होणार, असा प्रश्न असल्याची खंत नातेवाईकांनी बोलून दाखवली.
------------------
सीएनजी संपल्याने घात झाला!
ठाण्यातील बाळकूम येथे वास्तव्याला असलेला पूर्णेश जाधव हा टुरिस्टची गाडी चालवतो. आज सायंकाळी दादरचे भाडे आल्याने तो दुपारी मुंबईला गेला होता. माघारी परतत असताना गाडीतील सीएनजी संपल्याने तो छेडानगरच्या पेट्रोल पंपावर थांबला होता. तेव्हा त्याचे पत्नीसोबत बोलणेही झाले. फोन ठेवल्यानंतर काही क्षणांतच होर्डिंग कोसळून अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची बातमी पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन उचलला जात नव्‍हता. काही वेळातच रुग्णालयातून फोन आला आणि मनाती शंका खरी ठरली. बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली, अशी भावना त्याचा चुलतभाऊ विशाल गायकवाड याने व्यक्त केली.
---------------
दोन मुली, मुलाचे पितृछत्र हिरावले!
मूळचा बिहारचा असलेला दिलीप पासवान हा मुंबईत पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये कामाला आहे. दुर्घटना घडली तेव्हा तोही आपल्या गाडीत पेट्रोल पंपावर होता. त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याला एक तीन वर्षांची आणि पाच वर्षांची अशा दोन मुली आणि चार महिन्यांच्या मुलाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याची भावना नातेवाईकांना व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com