आता दरवर्षी बांधकाम गुणवत्तेची हमी देणे बंधनकारक

आता दरवर्षी बांधकाम गुणवत्तेची हमी देणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : गृहनिर्माण प्रकल्प उभारणाऱ्या विकसकांना आता दरवर्षी आपल्या बांधकामाच्या गुणवत्तेची हमी द्यावी लागणार आहे. त्यासाठी महारेरा प्राधिकरणाने स्वयंघोषित घोषणापत्राचा मसुदा तयार केला असून त्यावर सूचना हरकती मागवल्या आहेत. महारेराच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे घर खरेदीदारांना चांगल्या गुणवत्तेची घरे मिळू शकणार आहेत. तसेच एकदा घर खरेदी केल्यानंतर विकसकांच्या मागे लागू नये, म्हणून ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गृहनिर्माण प्रकल्पाची गुणवत्ता, त्याची संरचना संकल्पन, स्थिरता आणि चाचण्या, त्या प्रकल्पात वापरलेली विविध प्रकारची सामग्री, मनुष्यबळाची कुशलता, गुणवत्ता आणि अग्निसुरक्षा याबाबत चांगली गुणवत्ता असणे आवश्यक आहे. याबाबत प्रवर्तक प्रत्येक टप्प्यावर काटेकोरपणे काळजी घेत असेल तर प्रकल्पाची गुणवत्ता चांगली राहायला मदत होते. प्रत्येक प्रवर्तक आपला प्रकल्प सर्वच बाबतीत उत्तम आहे, असा दावा करीत असतो; परंतु यापुढे तशी हमी विकसकाने महारेरामार्फत दरवर्षी २३ मेपूर्वी देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ‘प्रकल्पाच्या गुणवत्ता हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्राचा’ मसुदा महारेराने सूचना, मतांसाठी संकेतस्थळावर जाहीर केला आहे. यावर सूचना, हरकती २३ मेपर्यंत suggestions.maharera@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन महारेराने केले आहे.
------------------
विश्वासार्हता वाढण्यास मदत
सुरुवातीची संक्रमणावस्था संपेपर्यंत विकसकांना हे मानांकन ऐच्छिक राहील. या टप्प्यात जे विकसक या यंत्रणेचा स्वीकार करतील त्यांची नावे महारेराच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातील. त्यामुळे संबंधित विकसकांची, प्रकल्पांची ग्राहकांच्या दृष्टीने विश्वासार्हता वाढायला मदत होणार आहे. संक्रमणावस्थेनंतर ही व्यवस्था सर्व विकसकांना बंधनकारक राहणार आहे.
---------------------
पाच वर्षे स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागणार
दोष दयित्व कालावधीच्या तरतुदीनुसार, घरांत राहिलेल्या त्रुटी हस्तांतरणापासून पाच वर्षांपर्यंत विकसकाला स्वखर्चाने ३० दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात. यामुळे ग्राहकहीत जपले जात असले तरी मुळात तशी वेळच येऊ नये, अशी महारेराची भूमिका आहे. म्हणूनच बांधकामांबाबत प्रमाणित कार्यपद्धती आणि मानके ठरविण्यासाठी महारेराने हा पुढाकार घेतलेला आहे. सल्लामसलत पेपरवर आलेल्या सूचना, मते आणि या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी बोलून हे सविस्तर परिपत्रक आणि घोषणापत्र तयार करण्यात आलेले आहे.
---------------
या बाबीही महत्त्वाच्या
गृह प्रकल्प उभारणीच्या ठिकाणी मातीची चाचणी केली का, प्रकल्पासाठी संरचना अभियंता नेमला का, सर्वच कामांच्या गुणवत्ता संनियंत्रणासाठी, प्रकल्प अभियंत्याला वेळोवेळी प्रमाणित करता येईल, अशी नोंदवही प्रकल्पस्थळी ठेवली आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रकल्पस्थळी चाचणीची सोय आहे का, बहुमजली इमारत असल्यास भूकंपरोधक यंत्रणा आहे का? गरजेनुसार पूरप्रतिबंधक तरतूद आहे का, या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जाणार आहेत.
----------------
सिमेंट, स्टीलची नोंद
प्रकल्पांत वापरलेले सिमेंट, काँक्रीट, स्टील, इलेक्ट्रीकल वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण यंत्रणा आदी सामग्री कशा प्रकारची वापरली आहे, याची नोंद ठेवणे, बांधकामासाठी वापरलेल्या पाण्याच्या चाचण्या केल्या आहेत का, याचीही नोंद ठेवावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com