घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

मृतांचा आकडा १४वर
एक गंभीर; ४२ जणांवर उपचार सुरू, ३१ जणांना घरी सोडले
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४वर गेला आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांत ४४ जणांवर उपचार सुरू असून ३१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रात्री चार जणांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले होते, तर उपचारादरम्यान नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सकाळपासूनच संबंधितांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गर्दी केली होती.
वादळी वाऱ्यामुळे सोमवारी सायंकाळी पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात ८८ जण जखमी झाले होते. त्यापैकी ५५ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर सायन रुग्णालयात एक, केईएम रुग्णालयात पाच, कळवा येथील रुग्णालयात एकास दाखल केले होते. दरम्यान, राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी चार जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर सकाळपर्यंत उपचारादरम्यान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता भारती राजुलवाला यांनी दिली. सायन रुग्णालयात दाखल केलेल्या एकाचाही मृत्यू झाला असून असा एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
...
४२ जणांवर उपचार सुरू
या दुर्घटनेत जखमी झालेल्या ४२ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३६ जण राजावाडी रुग्णालयात असून एकाची प्रकृती गंभीर आहे. केईएम रुग्णालयात पाच तर कळवा येथील रुग्णालयात एकावर उपचार सुरू आहेत.
...
मृत्यू झालेल्यांची नावे
भारत राठोड
चांद्रमनी प्रजापती
दिनेशकुमार जैस्वाल
मोहम्मद अक्रम
बशीर अहमद शेख
दिलीप पासवान
पूर्णेश जाधव
सतीश सिंग
फहीम खान
सूरज चव्हाण
दिनेश चौहान
हंसनाथ गुप्ता
सचिन यादव
...
दोषींवर कारवाई करा ः विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजावाडी रुग्णालयात भेट देत जखमींची पाहणी केली. राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने ‘चंदा है, धंदा है’ या पद्धतीने कामे केली जात असल्याने मुंबईत अनागोंदी वाढली आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच ४० फुटांच्या होर्डिंगची परवानगी असताना १२० फुटांचे कसे उभारले, असा सवालही त्यांनी केली. त्याचबरोबर पालिकेने या अनियमिततेवर कारवाई का केली नाही, असाही सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
...
संजय पाटील- सोमय्या यांच्यात बाचाबाची
होर्डिंग दुर्घटनेनंतर आपत्कालीन कर्मचारी सातत्याने लोखंडी सांगाडा हटवण्याबरोबरच त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी बचावकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे पाहून शिवसेनेचे (ठाकरे गट) उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सोमय्या यांना बचावकार्यात अडथळा येऊ नये, म्हणून घटनास्थळी भेट न देण्याची विनंती केली. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.
...
बचाव कार्यात एमएमआरडीएची महत्त्वाची भूमिका
होर्डिंग कोसळल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने आणि इतर बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; मात्र अवजड होर्डिंग उचलायचे कसे, असा प्रश्न होता. दरम्यान, एमएमआरडीएच्या मेट्रो-४ मार्गावर कार्यरत असलेल्या ६० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी चार हायड्राॅलिक क्रेनच्या साह्याने होर्डिंग उचलल्याने बचाव पथकांना त्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढणे शक्य झाल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com