गाड्यांचा चक्काचूर, माणसांचे काय झाले असेल?

गाड्यांचा चक्काचूर, माणसांचे काय झाले असेल?

गाड्यांचा चक्काचूर, माणसांचे काय झाले असेल?
होर्डिंग दुर्घटनास्थळी हळहळ; कामात दिरंगाई, प्रशासन हतबल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला. गाड्यांची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल, असा विचार दुर्घटनास्थळी आलेल्यांच्या मनात डोकावत होता. प्रत्येक जण भीषणता जाणवल्याने हळहळत होता. एक रात्र आणि संपूर्ण दिवस संपूनही होर्डिंग हटविता आले नाही. पालिका प्रशासनाची हतबलता त्यातून दिसून येत आहे.
काल रात्रभर होर्डिंग हटविण्याचे काम सुरू होते. होर्डिंगमुळे दबलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले जात होते. वाचलेल्या लोकांवर उपचार केले जात आहेत. अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान, पालिका कर्मचारी यांनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. होर्डिंग हटविण्याचे काम आज उशिरापर्यंत सुरू होते. पालिका प्रशासन होर्डिंग हटविताना हतबल झाले आहे. पालिकेकडे गॅस कटरची कमतरता असल्याचे दिसून आले. त्यामुळे होर्डिंग हटविण्यात उशीर लागत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. पालिकेचे पथक कार्यरत होते; मात्र त्यांच्याकडे होर्डिंग हटविण्याचे साहित्य नव्हते. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हते. अग्निशमन दलाकडेही पुरेसे साहित्य नव्हते. त्यामुळे पालिकेच्या स्थानिक प्रशासनाची हतबलता यानिमित्ताने दिसून आली.
...
समन्वयाचा अभाव!
होर्डिंग हटविण्याच्या कामात समन्वय नसल्याने या कामात दिरंगाई होत असल्याचे या विभागाच्या स्थानिक माजी नगरसेविका आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी सांगितले. या कामासाठी लागणारे कुशल कामगार पालिकेकडे नाहीत. साधने नाहीत. पालिकेचे अधिकारी अशा आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास समर्थ नाहीत. त्यामुळे अजूनही होर्डिंग हटविण्यात आले नाही. होर्डिंगचा पाया अवघा सहा फूट आहे. त्याला परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही त्यांनी केला.
...
आवाज नंतर बंद झाला!
आम्ही साडेचार वाजता दुर्घटना घडल्याचे समजताच येथे दाखल झालो. मदतीला कोणीच नव्हते. अडकलेल्या लोकांचा आक्रोश सुरू होता. मदत करण्यासाठी लोक आक्रोश करीत होते. जमेल तसे लोकांना बाहेर काढले जात होते. अडकलेले लोक मोबाईलची बॅटरी दाखवून आम्हाला बाहेर काढा, असे सांगत होते. काहींचा आवाज नंतर बंद झाला, असे सूरज भोसले यांनी सांगितले.
...
रिक्षाचा शोध
वडिलांना राजावाडी रुग्णालयात दाखल करून ओंकार दराडे हा तरुण आपल्या वडिलांची रिक्षा कुठे सापडते काय, हे शोधत होता. सर्वत्र वाहनांचा चक्काचूर झाला होता. त्यात रिक्षा सापडली नाही. अखेर त्याने पोलिसांत नोंद केली.
...
पालिका आयुक्तांनी दिले आदेश
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या चोवीस विभागांतील सहायक आयुक्तांना आपापल्या विभागांत अनधिकृत होर्डिंग्जचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आज दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com