प्रवेश शुल्कासाठी लवकरच केंद्रीभूत प्रणाली

प्रवेश शुल्कासाठी लवकरच केंद्रीभूत प्रणाली

मुंबई, ता. १५ : राज्यातील विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क विविध महाविद्यालय प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात वाढविले जाते. यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीतून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणही संकटात सापडल्याचे दिसत असल्याने यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रवेशासोबतच शुल्कासंदर्भात केंद्रीभूत प्रणाली विकसित करावी, अशी सूचना राज्य शुल्क नियामक प्राधिकरणाने केली आहे. ही प्रणाली २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया आणि त्यासाठीच्या जागा वाटप होण्यापूर्वीच विकसित करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, अशीही सूचना प्राधिकरणाने केली आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क काही व्यावसायिक महाविद्यालये आकारत आहेत. नियमि‍त आणि संस्थांच्या कोट्यातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क निश्चित केलेले असताना काही विनाअनुदानित बीएएसएस आदी व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या राज्यातील काही शिक्षण संस्थांनी तीन आणि काहींनी तर थेट पाच पटींहून अधिक शुल्काची मागणी करून त्यांची अडवणूक केली आहे. त्याविरोधात प्राधिकरणाकडे २० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीभूत प्रणाली विकसित करणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
राज्यातील खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांच्या शुल्कांचे प्रवेश आणि शुल्कांचे नियमन व्हावे, यासाठी राज्य विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ मधील तरतुदीनुसार प्रवेशाच्या प्रत्येक टप्प्यावर शुल्काबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सीईटी सेलची जबाबदारी आहे. तसे अनेक अधिकार त्यांना आहेत. यामुळे राज्य सीईटी सेलने प्रवेशासाठी अधिकचे शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांना रोखून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एक केंद्रीभूत प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे, असे प्राधिकरणाने नमूद केले आहे.
…...
अशी असणार यंत्रणा
सीईटी सेलच्या माध्यमातून प्रस्तावित प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण केले जातील. त्यांचे शुल्क सीईटीच्या खात्यात जमा करून ते तिथून संबंधित महाविद्यालयांच्या खात्यात जमा होतील, अशी सोय करणे आवश्यक आहे. या प्रणालीमुळे सीईटीमार्फत कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काविषयी तक्रारी येणार नाहीत.
….
‘तातडीने निर्णय घ्या’
सीईटी सेलच्या खात्यातून हे शुल्क जमा झाल्याने संबंधित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारण्याचे मार्गही बंद होतील. यामुळे शुल्कासाठी ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षण‍िक वर्ष, अभ्यासक्रम अडचणीत सापडले आहेत, त्यांची ही अडचणही दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे सीईटी सेलने तातडीने प्रवेशासोबतच शुल्कासाठी केंद्रीभूत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्याची सूचना राज्य शुल्क नियामक प्राधिकरणाने सीईटी सेलला केली आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com