घाटकोपर होर्डींग दुर्घटना

घाटकोपर होर्डींग दुर्घटना

आरोपी भावेश भिंडेवरून आरोप-प्रत्यारोप
उद्धव ठाकरेंसोबतचे छायाचित्र ट्वीट
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १४ : घाटकोपरमधील होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला. घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे हा फरार झाला आहे. लोकसभा निवडणूक सुरू असल्यामुळे यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. भिंडे यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या छायाचित्रावरून शिवसेना शिंदे गट, भाजपने शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. त्यावर ठाकरे गटाने पलटवार केला आहे.

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा ठाकरे गटासोबत काम करण्यास तयार झाला होता. त्याच्याकडे मुंबईतील होर्डिंगची जबाबदारी देण्यात आली. त्याला पालिकेकडून होर्डिंगचे कंत्राट देण्यात आले. त्या मोबदल्यात ठाकरे गटाच्या नेत्यांचे वाढदिवस आणि निवडणूक प्रचारासाठी या बेकायदा होर्डिंगचा वापर झाला, असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला. खरा सूत्रधार शोधण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी ‘मातोश्री’कडे अंगुलीनिर्देश केला.

भाजपचे आमदार राम कदम यांनी भिंडे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्वीट केला. त्याच्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते, असा आरोप राम कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
-----
विरोधी पक्षाचे प्रत्युत्तर
आशियातील सर्वांत मोठे होर्डिंग लावल्याचा विश्‍वविक्रम करणाऱ्या अजमेरा रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रा कंपनीचे धवल अजमेरा यांचा नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून या दाव्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झाला आहे.

कोण आहे भावेश भिंडे?
जानेवारी २०२४ मध्ये घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी हायकोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. आरोपपत्र दाखल झाले आहे. २००९ मध्ये भिंडेने अपक्ष उमेदवार म्हणून मुलंड विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्‍हा त्याचे डिपॉझिट जप्त झाले. बेकायदा फलक लावल्याप्रकरणी आतापर्यंत त्याला पालिकेने २१ वेळा दंड ठोठावला आहे. धनादेश बाऊन्सप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. होर्डिंग कोसळल्याच्या अपघातात भारतीय दंड विधान कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), कलम ३३८ (गंभीर दुखापत), कलम ३३७ (निष्काळजीमुळे गंभीर दुखापत) आणि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com