ठाणे पान दोन पट्टा

ठाणे पान दोन पट्टा

रुग्णाच्या सोनसाखळीची चोरी
ठाणे (वार्ताहर) : रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) घडली आहे. अचानक रक्ताची उलटी झाल्याने एका महिला रुग्णाला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या गळ्यात ७० हजार रुपयांची १५ ग्रॅमची सोनसाखळी होती; मात्र गळ्यातील सोनसाखळी आढळून न आल्याने याप्रकरणी शनिवारी (ता. ११) अज्ञाताविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार प्रसाद सगुण मांजरेकर (४५) यांच्या आईला २३ एप्रिल रोजी अचानक रक्ताची उलटी झाल्याने उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना रूम नंबर ६०६ मध्ये उपचारासाठी दाखल केले. तेव्हापासून अपर्णा मांजरेकर उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या आईच्या गळ्यात सोन्याची १५ ग्रॅम वजनाची साखळी होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. १०) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्रसाद यांना त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची साखळी आढळली नाही. तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
.........................
पडघा परिसरात वादळीवाऱ्याने ६८ घरांचे नुकसान
पडघा (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या पडघ्यामध्ये ६८ घरांचे वादळीवाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. १३) दुपारी अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने दिनकरपाडा येथे सहा कातकरी वाडीत २६ मोहंडुळमध्ये चार, तुळशी येथे दोन, ढोकलपाड्यात पाच, मानीचा पाड्यात दोन, भोकरी येथे एक, गोराड ठाकूरपाड्यात १७, कोशिंबी तलाठी सझा हद्दीतील खानिवलीत पाच झाडे वादळीवाऱ्याने पडली. तसेच ६८ घरे, झोपड्यांवरील पत्रे उडाले. कौले, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या घरांची श्रमजीवी संघटनेच्या वतीने तत्काळ पाहणी करण्यात आली. जयाताई पारधी, केशव पारधी, मारुती भांगरे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना धीर दिला. तसेच संबंधित तलाठ्यांकडे तत्काळ नुकसानभरपाईची मागणी केली. त्यामुळे मंगळवारपासून संबंधित तलाठी जाधव (वडवलीतर्फे राहूर सझा) अविनाश चव्हाण (मोंहडुळ), नरसूबाबा तुगावे (कोंशिबी) यांनी नुकसानग्रस्त ६८ कुटुंबांच्या घरांचे पंचनामे केले.
.....................
कुसुम हरड यांचे निधन
मुरबाड (बातमीदार) : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कुसुम भास्कर हरड यांचे गुरुवारी (ता. १५) रोजी दीर्घ आजाराने शिवळे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती भास्कर हरड, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी माजी आमदार गोटीराम पवार, तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....................
संस्कार शिबिरात सूर्यनमस्कार प्रशिक्षण
अंबरनाथ (बातमीदार) : अंबरनाथच्या सिद्धीविनायक नगरात पाच दिवसीय संस्कार भारती शिबिराचे आयोजन केले होते. संस्कार भारतीच्या शिबिरात सूर्यनमस्कार, योगा आणि विविध खेळांच्या जोडीला संस्काराचे महत्त्व पटवून देण्यात आले. निवृत्त नौदल अधिकारी राम बिनय शर्मा, निवृत्त शिक्षिका नारखेडे, सेवा भारतीचे कोकण प्रांत सचिव आनंद राऊळ, अंबरनाथ जिल्हाध्यक्ष मोहनीश तेलवणे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. पाच दिवस चाललेल्या शिबिरात सूर्यनमस्कार, योग तसेच विविध खेळ याबाबत संघ विस्तारक केतन खरात, मृण्मयी चोडनकर, नमन विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. याच शिबिरात स्मिता कर्वे यांनी तोरण कसे करावे, याविषयी तर चित्रकार विक्रमादित्य घाग यांनी भेटकार्ड आणि रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण दिले. कल्याण विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा संघाचे सेवा प्रमुख श्रीरंग पिंपळीकर, डॉ. जीवन चौधरी, रितेश बनसोडे, सेवा कोकण विभागप्रमुख धनंजय जठार यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. यावेळी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन धनंजय जठार यांनी उपस्थित पालकांना केले. गौरी पाठक, सुप्रिया पाध्ये, श्रीरंग पिंपळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर तळवलेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
.....................
संतोष मलबारी यांची उपाध्यक्षपदी निवड
सरळगाव (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या उपाध्यक्षपदी संतोष मलबारी यांची निवड करण्यात आली आहे. अथक परिश्रम करून मलबारी यांनी शरीरसौष्ठव खेळात आपला ठसा निर्माण केला आहे. त्यांनी अनेक ठिकाणी शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घेत अनेक पदकांवर आपले नाव कोरले आहे. आपल्या तालमीत अनेक तरुणांना या खेळाचे धडे देऊन पारंगत केले आहे. या सर्व कामगिरीचा विचार करून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यसंघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती यशस्वी करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया संतोष मलबारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com