नवमतदारांचा कल नोटाकडे

नवमतदारांचा कल नोटाकडे

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्यात पक्षामधील फाटाफूट, बदलत्या वैचारिक, राजकीय भूमिका यामुळे झालेला वैचारिक गोंधळ हा १८ ते २३ या वयोगटातील नवमतदारांच्या पचनी पडलेला दिसत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी होत असलेले पक्षांतर, काही क्षणात बदलेल्या वैचारिक भूमिका हे राज्यासाठी काही नवीन नाही. मात्र हा राजकीय गोंधळ तरुणाईच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे यावेळी मतदान करायचे, पण ते ‘नोटा’ला करू, अशा भावना या नवमतदारांकडून व्यक्त होत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात ३० हजार आणि उपनगर जिल्ह्यात सुमारे ८० हजार नवमतदारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. पहिल्यांदा मतदान करणारा हा तरुण वर्ग मतदानासाठी उत्साही आहे. तसेच निवडणूक आयोगही नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून शाळा-कॉलेज, सोशल मीडियातून आवाहन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या नवख्या मतदारांना राज्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट फारशी भावली नाही. नवमतदारांच्या बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबईत तर एकाच पक्षातील सहकारी असलेले एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’ ला मतदान करत आपली नाराजी दाखवण्याची मानसिकता या तरुणांची असल्याचे दिसत आहे.
-----------
नाराजीचे प्रतिबिंब
आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यास कोणाला मतदान करायचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहायचा. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ‘नन ऑफ द अबाव्ह’ (नोटा) म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही, हा पर्याय दिला होता. त्यामुळे अनेक मतदार हा पर्याय निवडताना दिसतात. दरम्यान, नोटाला मिळालेली मते कुठेही ग्राह्य धरली जात नसली तरी मतदारांना नाराजी व्यक्त करण्याचा एक ठोस पर्याय आहे. यंदा २०१९ च्या तुलनेत नोटाला जास्त मते मिळतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
------------------

मुंबई शहर जिल्हा
एकूण नवमतदार - २५४८५
पुरुष - १४५६८
स्त्री - १०९७१
------
मुंबई उपनगर जिल्हा
एकूण नवमतदार - ८४ हजार
पुरुष - ४७ हजार २१९
स्त्री - ३६ हजार ७७६
तृतीयपंथी - ५
------ --------

नोटाला मिळालेली मते
मतदारसंघ २,०१९ २,०१४
उत्तर मुंबई ११,९६६ ८,७५८
उत्तर पश्चिम मुंबई १८,२२५ ११,००९
उत्तर पूर्व मुंबई १२,४६६ ७,११४
उत्तर मध्य मुंबई १०,६६९ ६,९३७
दक्षिण मध्य मुंबई १३,८३४ ९,५७१
दक्षिण मुंबई १५,११५ ९,५७३

….
लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मात्र एका पक्षातून निवडून आलेले उमेदवार दुसऱ्या दिवशी विरोधात उभे राहतात. अशा पक्षांतरामुळे लोकशाही कशी मजबूत होणार, असा प्रश्‍न पडतो.
- प्रणव पाटेकर, नवमतदार (विलेपार्ले)
...
नुसते मतदारांनी प्रामाणिकपणे मतदान करून उपयोग नाही, तर उमेदवारांनीही आपली राजकीय, वैचारिक भूमिका बदलणे योग्य नाही. त्यामुळे भविष्यात पश्चाताप होऊ नये म्हणून नोटा पर्याय निवडणे योग्य आहे, असे आम्हाला वाटते.
- रामकरण गुप्ता, नवमतदार (कुर्ला)
…..
चुकीच्या उमेदवाराला मतदान करून त्याला ताकद देण्यापेक्षा नोटाला मतदान करून आपली नाराजी व्यक्त करणे म्हणजे उमेदवारांना आरसा दाखवण्यासारखे आहे.
- वर्षा गावित, नवमतदार (कुर्ला-नेहरूनगर)
….
निवडणूक आयोगाने नोटाला मिळणारी मते विजयी उमेदवाराच्या एकूण मतांमधून कमी केल्यास उमेदवारांना नोटाचे महत्त्व कळेल.
- विश्वास पुरोहित, नवमतदार (कलिना)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com