मिठीच्या मगरमिठीतून सुटका केव्हा ?

मिठीच्या मगरमिठीतून सुटका केव्हा ?

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पावसाळा म्हटले की मिठी नदीलगतच्या कुर्ला गार्डन, कोर्ट, टॅक्सीमन कॉलनी, सीएसटी रोड, क्रांती नगर, संतोष नगर, कमानी, बैल बाजार, जरीमरी परिसरातील झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरतेच. सध्या निवडणुकीच्या काळात आम्हाला सर्वजण आश्वासनांची खैरात करत आहेत. मात्र, मिठीची मगरमिठी कधी सुटणार, हे कुणीच सांगत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. ‘सकाळ’ने साधलेल्या संवादात येथील नागरिकांशी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कुर्ला, कलिना आणि चांदीवली या तीन विधानसभा मतदारसंघातील जवळपास ५० हजारहून अधिक कुटुंबांना पावसाळ्यात मिठी नदीच्या घरात घुसणाऱ्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी पालिका प्रशासन, एमएमआरडीए मिठी नदीचे रुंदीकरण, गाळ काढणे अशी काम करत असले तरी रहिवाशांची मात्र भरणाऱ्या पाण्यातून सुटका झालेली नाही. निवडणुकीचा काळ सुरू आहे. नेते, कार्यकर्ते मत मागण्यासाठी येत आहेत. मात्र, झोपडपट्टीत भरणारे पाणी कधी थांबणार, यावर कोणीच बोलत नाही किंवा ठोस उत्तर देत नाही, अशा भावना येथील नागरिकांच्या आहेत.
-------------------
दरवर्षी हजारो रुपयांचा फटका
घरात मिठी नदीच्या पुराचे पाणी भरल्याने दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होते. घरातील लाकडी सामान भिजल्याने वाळवी लागून खराब होते. तसेच टीव्ही, फ्रीज, पाण्याची मोटार अशी विद्युत उपकरणे निकामी होतात. झोपडपट्टी परिसरात नेहमीच भेडसावणाऱ्या समस्येवर कोणीच बोलत नाही, असे ज्येष्ठ नागरिक रामदास गायकवाड यांनी सांगितले.
---------------------
नेहमीच होते सफाई
महापालिका आणि एमएमआरडीएकडून नेहमीच पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्याचे, रुंदीकरणाचे काम केले जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्ची केले जातात. २००५ला मुंबईत पाणी भरल्यापासून हे सुरू आहे. मात्र, २० वर्षांनंतरही समस्या सुटलेली नाही.
------------------------
निवडणूक प्रचारासाठी दररोज नाक्यावर, गल्लीत उमेदवार, कार्यकर्ते फेऱ्या मारतात. मते मागतात; पण मिठीचे झोपडपट्टीत भरणारे पाणी कधी थांबणार, यावर अक्षरही काढत नाहीत.
- कलावती दोरगे, रहिवासी
...
सखल भागात मिठी नदीचे पाणी येऊ नये, म्हणून अनेक ठिकाणी संरक्षक भिंत उभारली आहे, मात्र त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने पैसे खर्च करूनही पाणी समस्या जैसे थे आहे.
- राजू मोहिते, सामाजिक कार्यकर्ते
...
राजकीय पक्षांनी खूप मोठा विकास आणि कायापालट करण्याचे आश्‍वासन देण्याऐवजी झोपडपट्टीत गोरगरिबांच्या घरात पावसाळ्यात भरणारे पाणी थांबावे, म्हणून प्रयत्न करावा.
- विश्वास मांढरे, रहिवासी
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com