मतदान प्रक्रियेत नारीशक्तीची मोलाची भूमिका

मतदान प्रक्रियेत नारीशक्तीची मोलाची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : देशभरात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. मुंबईत पाचव्या टप्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. आता मतदानासाठी मतदार बाहेर येणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी ते मतमोजणी या सर्वच टप्प्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला मोलाचे योगदान देत आहेत.
लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सिस्टमॅटिक स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका, परिचारिका यांच्यासह मतदान प्रक्रियेत मोलाचा वाटा महिला अधिकारी उचलत आहेत. विविध माध्यमांतून मतदार जागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्यसुद्धा आहे. त्यामुळे सक्षम लोकशाहीसाठी चला मतदान करूया आणि लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात सहभागी होऊ या, असे आवाहन महिला अधिकाऱ्यांनी केले आहे.
--

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जात आहे. मतदारराजाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कामाच्या वेळेचे बंधन नसतानाही दिवस- रात्र एकत्रितरीत्या काम सुरू आहे.
- शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, बोरिवली
----
यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे, यासाठी गृहमतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मतदारांना सहजपणे मतदान करता यावे, यासाठी विशेष रांग, बससेवा, रंगीत चिठ्ठ्या, ब्रेल लिपी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व अधिकारी कर्मचारी निष्ठेने रात्रंदिवस काम करत आहेत.
- स्तुती चारण, केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी
----
राजकीय प्रचार करताना उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावावा, यासाठी स्वीप कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.
- जयश्री कटारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मानखुर्द शिवाजीनगर
------
माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीत प्रत्यक्ष काम पाहताना उमेदवारांना डिजिटल जाहिराती आणि प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या मजकुराची प्रथम मान्यता घ्यावी लागते. यासाठी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केल्याने आत्तापर्यंत योग्यरीत्या काम सुरू आहे.
- जयश्री कोल्हे, सहायक समन्वय अधिकारी
-------
स्वीपअंतर्गत काम करताना मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी पथनाट्ये, मतदार संकल्पपत्र, बीएलओ नमुना सर्वेक्षण, गृहभेट उपक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. सामूहिक जबाबदारीने काम केल्यानेच मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या सुरू आहे.
- श्रद्धा मेश्राम, सहायक समन्वय अधिकारी, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ
--
सर्व माध्यमांची एकत्रित ताकद लक्षात घेऊन माध्यमांना एका छताखाली आणून माध्यम कक्षाचे दैनंदिन काम सुरू आहे. या समितीकडून सर्व वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक्स प्रसिद्धीमाध्यमांची छाननी केली जात आहे.
- काशीबाई थोरात, नोडल ऑफिसर, माध्यम कक्ष
--
मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. आयपीएल क्रिकेट खेळाडूमार्फत जनजागृतीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे स्टेशनवर काम करणारे हमाल, अंगणवाडी सेविका, कम्युनिटी हेल्थ वर्कर, परिचारिका आदींच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
- फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी
---
लोकसभा निवडणूक माध्यम कक्ष हा प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यामधील दुवा म्हणून काम करते. निवडणूक आयोगाने राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत नियमावली निश्चित केलेली आहे. या नियमावलीनुसार उमेदवारांनी जाहिराती पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.
- शैलजा पाटील, सहायक संचालक
---
मुंबई उपनगर जिल्ह्यात स्वीप समन्वयक म्हणून काम करताना निवडणूक प्रक्रियेसोबतच निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. संपूर्ण उपनगर जिल्ह्यातील निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने आणि सहकार्याने खूप चांगले काम केल्याचे समाधान आहे.
- प्रिया जांबळे पाटील, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com