स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर न केल्यास परवाना रद्द

स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर न केल्यास परवाना रद्द

अहवाल सादर न केल्यास परवाना रद्द
आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे पालिकेचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : मुंबईत महाकाय होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेनंतर ठाणे पालिका प्रशासनदेखील खडबडून जागे झाले असून बुधवारी (ता. १५) होर्डिंगमालकांची बैठक घेतली. या बैठकीत येत्या आठ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. तसेच दिलेल्या वेळेत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर न केल्यास परवानादेखील रद्द करण्यात येणार आहे.

सोमवारी (ता. १३) सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई घाटकोपरमधील एक भले मोठे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या घटनेनंतर मुंबईसह ठाणे पालिकादेखील अलर्ट मोडवर आली आहे. त्यानुसार बुधवारी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ज्या जाहिरातदारांनी मोठ्या आकाराच्या होर्डिंग उभारल्या आहेत, त्यांनी ते आठ दिवसांच्या आत नियमानुसार होर्डिंग लावावेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे; मात्र यापूर्वीदेखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. आता पुन्हा पुढील आठ दिवसांत ऑडिटचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिलेल्या वेळेत अहवाल सादर न केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाईदेखील करण्यात येणार आहे.

ठाणे पालिकेच्या वतीने २००३च्या सरकारच्या जाहिरात धोरणानुसार जाहिरातफलक उभारणीला परवानगी देण्यात येते. यापुढे जाहिरातफलक लावण्यासाठी परवानगी देताना शहराच्या सौंदर्याला बाधा येणार नाही, अशा पद्धतीने परवानगी देणे, किती क्षेत्रफळात अन् किती आकाराचे होर्डिंग उभे करता येईल, किती अंतरावर परवानगी देता येईल, याबरोबरच न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करणे, नागरिकांच्या दृष्टीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जाहिरात धोरणातील नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

होर्डिंगबाबत नियमावली
होर्डिंगबाबत पालिका प्रशासनाच्या नियमावलीत २० फुटापर्यंत होर्डिंग असावे, रस्त्याच्या अथवा पदपथाच्या बाजूला रस्त्यावर होर्डिंग असू नये, कोणते रंग असावेत कोणते असू नयेत, अश्लील मजकूर प्रसिद्ध होऊ नये, फुटपाथपासून चार फुटाच्या आतमध्ये होर्डिंग असावे, नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्या ठिकाणी होर्डिंग उभारण्यात येऊच नये, तसेच दोन होर्डिंगमध्ये कीती अंतर असावे, याची माहिती पालिकेने दिलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com