पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे ही चिंताजनक बाब असून भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्याची वेळ जिल्हावासीयांवर ओढवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत ठाणे पालिका आयुक्तांनी ठाणेकरांना पाण्याचा जपून वापर करण्याबरोबरच वाहने पिण्याच्या अथवा विंधन विहिरीच्या पाण्याने धुऊ नका, असे आदेश दिले आहेत; मात्र दुसरीकडे आजही बिनदिक्कतपणे शहरात ठिकठिकाणी वाहने धुतली जात आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात आहे. तर या वाहन धुणाऱ्यांवर पालिका काय कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. अवघे ३० ते ४० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर वाहने अथवा वॉशिंग गॅरेजमध्ये वाहने धुण्यास सक्त मनाई केली आहे; मात्र ठाणे शहराला होणाऱ्या मुबलक पाण्याचा गाडी धुण्यासाठी अपव्‍यय होत आहे.

वॉशिंग सेंटरमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन धुण्यासाठी एका वेळेसाठी जितके पैसे मोजावे लागतात. याच पैशात महिन्याभरात गाडी धुऊन देणारे अनेक आहेत. दुचाकीसाठी १५० ते २०० तर कारसाठी ५०० ते ६०० रुपयांत महिनाभर गाडी धुऊन दिली जाते. जुन्या इमारती अथवा सार्वजनिक नळावर पाणी फुकट मिळते. याचाच उपयोग करून वाहने चकाचक केली जातात. वाहने स्वस्तात स्वच्छ करून मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच वाहने धुतली जात आहेत.

दिवसाला ५८५ एमएलडी पाणी
शहराला दर दिवसाला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होतो; मात्र इतका पुरवठा होऊनदेखील अनेक सोसायटींना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते. तर दुसरीकडे रोजच्या वापरातील पाणी गाड्या धुण्यासाठी वापरले जात आहे. एकीकडे पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे व वाहने न धुण्याचे आवाहन त्याला नागरिक हरताळ फासत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com