ठाण्यात धडाडणार प्रचार तोफा

ठाण्यात धडाडणार प्रचार तोफा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ठाण्यात पहिल्यांदाच संयुक्त सभा गुरुवारी (ता. १६) होणार आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे गुरुवारीच ठाण्यात येऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार काय बोलणार आणि विनोद तावडे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र काय देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्याबरोबरच चौक सभांचा सपाटा लावला जात आहे. अशातच शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात प्रचाराची गाडी जोरात धावत आहे. त्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्याच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के, तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे राजन विचारे आमनेसामने आले आहेत. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघेंचा खरा शिष्य कोण, गद्दार विरुद्ध निष्ठावंत या मुद्द्यांवर प्रचार होत आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून अवघे तीन दिवसच शिल्लक राहिले आहे. त्यात ठाण्यात गुरुवारी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार यांची एकत्रित सभा गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील चौकात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. त्या‍मुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे सुद्धा गुरुवारी ठाण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका तावडे घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री शनिवारी ठाण्यात
उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची टिपटाॅप प्लाझा येथे शनिवार (ता. १८) दुपारी ३ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो किंवा सभाही होणार आहे; मात्र त्याची तारीख आणि ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही.

पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा सभा
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे राजकीय भूकंप घडला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद रंगला आहे. अशातच ठाणे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्ताने उद्धव ठाकरे यांची गुरुवारी ठाण्यात पहिल्यांदाच सभा होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतही झालेल्या बंडानंतर शरद पवार यांचीही ठाण्यात पहिल्यांदाच सभा होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com