अवकाळीने ७४५ घरे दुर्घटनाग्रस्त

अवकाळीने ७४५ घरे दुर्घटनाग्रस्त

पालघर, ता. १५ (बातमीदार) : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या २७० एकरांहून अधिक बागायत क्षेत्राचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच पावसामुळे ७४५ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवर झाडे पडली आहेत, तर काही घरांचे पत्रे आणि कौले उडून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात महावितरणचे एकूण ३० खांब वादळामुळे व झाडे पडल्याने वाकले आहेत, तर काही ठिकाणी भुईसपाट झाले आहेत. तारा तुटल्यानेही महावितरणचे नुकसान झाले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विक्रमगड तालुक्यात १५ घरांचे नुकसान झाले असून कौले व पत्रे उडाली आहेत. घरावर झाडे पडल्याने तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच २२ एकर क्षेत्राचे आंबे व अन्य फळझाडांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तारा तुटून मोठ्या प्रमाणात महावितरणचे नुकसान झाले आहे.

तलासरी तालुक्यात २५५ घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये अनेक कच्ची आणि पक्की घरे पडली आहेत. अनेक घरांची कौले व पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे, तसेच झाड घरावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात १२० एकर क्षेत्राचे फळबागांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात वीज वितरणचे दहा खांब वादळी वाऱ्यामुळे वाकले आहेत, तसेच उन्मळून पडले आहेत. वीजवाहिन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोखाडा तालुक्यात ३४ घरांचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी काही वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आंबा, जांभूळ फळे वादळी वाऱ्यामुळे गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोखाडा आणि जव्हार तालुक्यात महावितरणचे १६ खांब वाकले असून तिथे ताराही तुटल्या आहेत.

डहाणू तालुक्यात २२७ घरांचे नुकसान झाले. काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच धुंदलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडून गेले आहेत; त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेली आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. तालुक्यात असलेल्या पशुसंवर्धन विभागामार्गात कुक्कुटपालन करत असलेल्या शेतकऱ्यांचे शेडचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.

जव्हार तालुक्यात २०३ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ११२ एकर क्षेत्रातील आंबा, केळी, पपई यांचे नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यात पारगाव, सोनावे, गिराळे, नावजे या भागात १७ घरांची हानी झाली. तालुक्यात विजेचे दोन खांब वाकले आहेत. वीजप्रवाह सुरू करण्याचे काम सर्वत्र सुरू करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. वाडा तालुक्यात चार घरांचे नुकसान झाले असून फळबागांचे नुकसान झाले. तसेच झाडे व त्याच्या फांद्या पडल्याने विजेच्या तारा तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी वादळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात १४ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने, तसेच फांद्या पडल्याने जिल्ह्यात जवळपास ३० खांब, तसेच मोठ्या प्रमाणात विजेच्या तारा तुटल्याने जिल्ह्यात जवळपास १५ ते १६ लाख रुपयांचे महावितरणचे नुकसान झाले आहे.
- सुनील भारंबे,
कार्यकारी अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com