मालवणी दारूकांडातील   
चौघांना सश्रम कारावास

मालवणी दारूकांडातील चौघांना सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मालाड-मालवणी येथे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या विषारी दारूकांड खटल्याचा निकाल आज (ता. १५) न्यायालयाने जाहीर केला. या हत्याकांड प्रकरणी विशेष न्यायालयाचे न्या. स्वप्नील तवशिकर यांनी राजू लंगडा, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डीमेल्लो आणि मन्सूर खान यांना दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
खटला रेंगाळल्याने उच्च न्यायालयाने तो जलदगतीने चालवण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले होते. त्यानुसार सत्र न्यायालयात यावर सुनावणी घेण्यात आली. दारूकांडात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी केली, तर आरोपींनी सुटकेची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्या. स्वप्नील तवशिकर यांनी आज आरोपी राजू लंगडा, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डीमेल्लो आणि मन्सूर खान या आरोपींना कलम ३०४ (२), १२० ब, ३०८, ३२६, ६५(अ), ६५(ब) अंतर्गत दोषी ठरवले, तसेच १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
----
१०६ जणांचा गेला होता बळी
मालाड-मालवणी परिसरात जून २०१५ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १०६ जणांचा बळी गेला होता. याप्रकरणी दारूअड्ड्याचा प्रमुख राजू लंगडा याच्यासह १६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील एकाचा मृत्यू झाला असून एक फरारी आहे. या आरोपींना दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून अटक केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com