पंतप्रधानांच्या रोड-शोच्या माध्यमातून भाजपचे मुंबईत शक्तिप्रदर्शन

पंतप्रधानांच्या रोड-शोच्या माध्यमातून भाजपचे मुंबईत शक्तिप्रदर्शन

पंतप्रधानांच्या रोड-शोच्या माध्यमातून भाजपचे मुंबईत शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. १५) घाटकोपर येथे मेगा रोड शो केला. यादरम्यान मार्गावर दुतर्फा कार्यकर्ते, नागरिक यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जवळपास सव्वातासाच्या या रोड शोच्या माध्यमातून मुंबईत महायुतीसाठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला. या रोड शोपाठोपाठ १७ मे रोजी पंतप्रधान पुन्हा प्रचार समारोपाच्या सभेला मुंबईत परतणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी घाटकोपर येथे रोड शो केला. यावेळी मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार, मिहीर कोटेचा यांच्यासह महायुतीचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. रोड शोला सुरुवात करण्यापूर्वी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. घाटकोपर पश्चिममधील एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क येथून सुरू झालेला रोड शो घाटकोपर पूर्वेतील रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त झाला. जवळपास अडीच किलोमीटर अंतराचा हा रोड शो होता. यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भाजप कार्यकर्ते आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र होते. पंतप्रधानांचा ताफा हळूहळू मार्गक्रमण करत होता. समारोपाच्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप करण्यात आला.
...
‘जय श्रीराम’सह ‘मोदी मोदी’ घोषणा
‘अब की बार ४०० पार, फिर एक बार, मोदी सरकार, जय श्रीराम’ यांसह ‘मोदी मोदी’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी करून रोड शोला चांगला प्रतिसाद दिला. या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले सहभागी झाली होती. पंतप्रधानांचा रोड शो पाहणाऱ्यांमध्ये गुजरात भाषिकांची संख्या जास्त असल्याचे चित्र होते.
...
मी नवी मुंबई येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो पाहायला आलो. मार्ग बंद असल्यामुळे चालत यावे लागले. माझी मोदी यांना बघण्याची खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली.
- अजय शाह, रहिवासी, नवी मुंबई
...
जन्मापासून मला चालता येत नाही; पण मोदींच्या रोड शोसाठी तीनचाकी गाडीवरून येथे आलो. रोड शो पाहून आनंद वाटला.
- सुभाष शर्मा, दिव्यांग
..
नरेंद्र मोदींवर आमचा भरोसा आहे. ते भारताच्या विकासासाठी काम करतील.
- साधू रामराज महाराज
...
नरेंद्र मोदी मुंबईचे उद्योग-धंदे गुजरातला घेऊन गेले. बेरोजगारी वाढली आहे. मुंबईत रोड शो करून काय साध्य करणार आहेत?
- विशाल हिवाळे, नागरिक
...
भाजपच्या ढोल-ताश्यावर मनसेचा नाच
दुपारी नियोजित रोड शोच्या मार्गावर वेगळ्यावेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. लेझीम आणि ढोल-ताशा पथके ठिकठिकाणी ताल धरत होती. रस्त्यांच्या दुतर्फा भाजपचे झेंडे, बॅनर झळकत होत. सर्वत्र मराठी, केरळ, गुजराती, पंजाबी असे अनेक ठिकाणचे लोकनृत्य आणि लोककलांचे प्रदर्शन सादर करण्यात आले. भाजपच्या ढोल-ताश्यांच्या तालावर मनसैनिक नाचत असल्याचे आगळेवेगळे दृष्य यावेळी पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com