भाज्‍या

भाज्‍या

अवकाळीने भाज्या कडाडल्या
एपीएमसीतील घाऊक दरात २०-२५ रुपयांची वाढ; नाशिक, पुणे जिल्‍ह्यातील उत्पादनात घट

वाशी, ता. २३ (बातमीदार) : राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या अवकाळीच्या पावसाचा परिणाम भाज्यांवर झाला असून बाजारातील आवक घटली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, फरसबी, कारले, वांगी आणि शिमला मिरचीचे दर किरकोळ बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. यंदा पावसाचा भाजी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पिकवलेल्या भाज्यांची मोठी आवक होते. राज्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले.
आठड्याभरापूर्वी वाशीतील एपीएमसीत दिवसाला ४०० ते ४५० गाड्या दाखल होत होत्या. पण आता आता ३०० ते ३५० गाड्यांच्या भाजीची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मुंबई तसेच उपनगरातील बाजारपेठेत भाज्यांची आवक घटल्‍याने दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, कारले, वांगी , शिमला मिरची या भाज्या प्रति किलो ६० ते ८० रुपयाने विकल्या जात आहेत, तर फरसबीने किरकोळ बाजारात शंभरी पार केल्याचे एपीएमसीतील व्यापारी के. डी. मोरे यांनी सांगितले.

परराज्यांतून भाज्याची आवक
सद्यःस्थितीत महाराष्ट्रातून भाज्यांची आवक कमी होत असून परराज्यांतील आवक वाढली आहे. हिमाचल प्रदेशातून फरसबी तसेच वाटणा येत असून गुजरातमधून वांगी, फ्लॉवर, कर्नाटकमधून मिरची, लिंबू, अद्रक येत आहे. एकीकडे वादळी पाऊस तर दुसरीकडे उन्हाच्या कडाक्‍यामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. मेथी, कोथिंबीर, शेपू आदी पालेभाज्‍यांची आवकही कमी झाल्‍याने दरात वाढ झाली आहे.

पावसामुळे भाजीपाल्‍याचे नुकसान झाले आहे. तर आता कडक उन्हाळा सुरू असल्याने भाज्यांना पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पुणे, नाशिक या ठिकाणांहून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्‍याची आवक होते. सध्या येथील आवक घटली आहे. परराज्यांतील भाजीपाला एपीएमसी येत आहे. पण त्यांचे दर चढे आहेत.
- के. डी. मोरे, भाजीपाला विक्रेते, घाऊक बाजार

जवळपास सर्वच भाज्याचे दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे बाजारात आल्यानंतर कोणत्या भाज्या घ्याव्यात असा प्रश्‍न पडतो. पाव किलो भाजी साठीही वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागतात. फळभाज्यांबरोबर पालेभाज्याचे दरही वधारले आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
- मनिषा खुटाळ, गृहिणी

एपीएमसीतील घाऊक दर
आठवड्यापूर्वी व सध्या
भेंडी ३८, ४५
दुधीभोपळा २२,२५
चवळी शेंग ३०, ४०
फरसबी ८०, १००
कारले ४२, ४५
वांगी २४, ३४
शिमला मिरची ३५, ४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com