ठाण्यात प्रथमच "गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन"

ठाण्यात प्रथमच "गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन"

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी ७ ते ९ जून या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, ७ जूनला उद्घाटन सोहळा, शनिवारी महाअधिवेशन आणि रविवारी ९ जूनला प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच महाअधिवेशन आहे. सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्पोपाहार आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. या वेळी गृहनिर्माण सोसायट्यांना लागणारे कीट दिले जाणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल याबरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या संदर्भात सरकारकडे पाठपुरावादेखील केला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन संस्थांचे स्टॉल्स
अधिवेशनात यासंदर्भातील वेगवेगळे ठरावदेखील पारित केले जाणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकसक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com