१८ तास बत्ती गुल

१८ तास बत्ती गुल

वाशीत १८ तास बत्ती गुल
उकाड्याने नागरिक हैराण

तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : सध्या तापमानात विक्रमी वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण आहेत. त्यात वाशी सेक्टर २६ येथे मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाल्‍यानं तब्बल १८ तास बत्ती गुल होती. बुधवारी (२२) रात्री नउच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या काही वेळासाठी सुरू झाला, मात्र त्‍यानंतर पुन्हा वीज गायब झाली. दुरस्‍तीच्या कामासाठी आणखी तीन-चार तास लागणार असल्‍याचे यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपासून सेक्टर २६ मध्ये दिवसातून किमान तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. एकदा वीज गायब झाली की तीन-चार तासांनी पुरवठा सुरू होतो. याबाबत स्थानिकांनी महावितरणकडे विचारणा केली असता, विजेची मागणी वाढल्याने केबल तुटणे, कधी कधी वाहिन्या नादुरुस्‍त होणे, केबल स्फोट आदी कारणे सांगण्यात येतात. बुधवारी रात्री बत्ती गुल झाल्याने एकीकडे उकाडा तर दुसरीकडे डासांची भुणभूण सुरू असल्‍याने अनेकांना रात्रभर जागरण करावे लागले. विजेअभावी पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला होता.
घणसोली गावातही काही दिवासांपूर्वी २० तास तर त्‍याआधी ऐरोली येथे १० तास वीज खंडित झाली होती. महावितरणाचा भोंगळ कारभाराचे फटका नेहमीच बसत असल्‍याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

जुनाट वीजवाहिन्या बदलण्याची गरज
सिडकोकालीन वीज वाहिन्या जुनाट, कमकुवत झाल्या आहेत. २५ ते ३५ वर्षे जुन्या वीजवाहिन्या, त्‍यात रस्त्‍यांचे खोदकाम, सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरणामुळे केबल नादुरुस्‍त होत आहेत. तर काही वेळा अतिदाबाने केबल जळाल्‍याचे प्रकारही घडले आहेत. जुनाट वाहिन्या बदलण्याची गरज असताना तात्पुरती दुरुस्ती होत असल्याने वारंवार बिघाड होत आहे.

काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. एकदा वीज गेली की तीन ते चार तासांनीच पुरवठा सुरळीत होतो. सध्या तापमान वाढल्‍याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. वीज नसल्याने रात्रभर जागरण होते.
- विलास मोरे, रहिवासी

रात्री गुल झालेली बत्ती दुसऱ्या दिवशी तब्‍बल १८ तासांनी सुरळीत झाली. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारही करण्यात आली आहेत. पुन्हा वीज पुरवठा खंडित झाल्यास, वाशी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.
- थॉमस चिरकुनुर, रहिवासी

महावितरणकडून पावसाळ्याआधी शहरातील विजेच्या केबल, डीपी बॉक्ससह आदी कामाची दुरुस्ती करावी. जेणेकरून पावसाळ्यात हा त्रास नागरिकांना होणार नाही.
- दिनेश गोरे, रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com