...अन् जो तो सैरावैरा पळू लागला‌!

...अन् जो तो सैरावैरा पळू लागला‌!

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : दुपारची २ वाजताची वेळ. सर्वत्र शांतता असताना अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांत आगीचा मोठा लोळ उंचच उंच उडाला. सर्वत्र धूरच धूर दिसत होता. दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात स्फोटाचे हादरे बसले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, दुकाने, घरांवरचे लोखंडी रॉड उडून मोठे नुकसान झाले. काचा फुटून त्या अंगावर पडल्याने अनेक जण जखमी झाले. तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातही हादरे बसले. नेमके काय झाले आहे, हे कुणालाच कळत नव्‍हते. जो तो सैरावैरा पळत होता.

दुपारची वेळ असल्याने कुणी जेवत होते, तर कुणी वामकुक्षी घेत होते. आजूबाजूच्या परिसरात साखरपुडा, डोहाळे जेवणासारखे कार्यक्रमही सुरू होते. अचानक झालेला आवाज आणि दुरून आकाशात उंच उडणारे आगीचे लोळ पाहून काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या. स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंबिवली स्टेशन परिसरात जाणवले. या हादऱ्यानंतर भूकंप आणि इमारत कोसळल्याची अफवा पसरली. त्यानंतर एमआयडीसी फेज २ मधील अमुदान या केमिकल कंपनीत रिॲक्टरच्या स्फोटामुळे हे हादरे बसल्याचे समजले. आगीच्या ठिकाणी हाहाकार उडाला होता. नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. कुणाचे डोके फुटले होते, तर कुणाचा हात तुटला होता. रक्तबंबाळ झालेल्या जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिक नागरिक धडपडत होते. स्फोटानंतर काही क्षणांत आगीने रौद्ररूप घेतले. त्याची झळ आजूबाजूच्या चार-पाच कंपन्यांनाही बसली. स्फोटामुळे कंपन्यांचे उडालेले पत्रे, लोखंडी रॉड, इतर सामान उडून परिसरातील दुकाने, शोरूम, वाहने आणि घरांचे नुकसान झाले. परिसरात रुग्णवाहिकांची ये-जा सुरू होती. जखमींना तातडीने नेपच्युन आणि एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
---
धुरामुळे दमछाक
आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या अग्मिशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र प्रचंड प्रमाणात धूर पसरलेला असल्याने कोणत्या कंपनीला आग लागली आहे, किती कंपन्यांचा आगीने ताबा घेतला आहे, याचा अंदाजच येत नव्‍हता. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची मोठी दमछाक झाली.
----
सर्वत्र काचांचा खच
स्फोटामुळे परिसरातील घरांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. कुणाच्या घराचे छप्पर उडाले, तर अनेकांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. कल्याण-शीळ रोड, एमआयडीसी परिसरात काचांचा अक्षरश: खच पडला होता. वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
----
प्रोबेसच्या आठवणी ताज्या
प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ रोजी झालेल्या स्फोटांत १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २१५ जण जखमी झाले होते. प्रोबेस कंपनीतील स्फोटाला २६ मे रोजी आठ वर्षे पूर्ण होतील. अमुदान केमिकल कंपनीतील स्फोटामुळे तेव्‍हाच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
-------
स्फोटाचे कारण अज्ञात
अमुदान कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अज्ञात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू होते. या कंपनीच्या शेजारील कारचे शोरूम, ओमेगा कंपनी, मेहता पेंट्स, डाईस कंपनी, के.जी.एन. कंपनीही भस्मसात झाली आहे. तसेच मॉडर्न इंडस्ट्रीज या कंपनीलाही झळ बसली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com