डोंबिवली पुन्हा हादरली

डोंबिवली पुन्हा हादरली

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : येथील एमआयडीसीतील फेज दोनमधील अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास रिॲक्टरच्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू, तर ६४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाचे हादरे जवळपास दोन ते तीन किलोमीटर परिसरात बसले. आजूबाजूच्या परिसराचे मोठे नुकसान झाले असून नेमके काय घडले, हे समजत नसल्याने परिसरात घबराट पसरली होती.

परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड मोठे लोट उसळत होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे आदी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.
---
घटनास्थळी मुख्यमंत्र्यांची भेट
दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच बाजूला असलेल्या म्हात्रेपाडा येथील नागरिकांचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच एम्स रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूसही केली.
-----
सर्वत्र गोंधळाचे वातावरण
डोंबिवलीच्या इतर परिसरात या स्फोटाचे हादरे बसले. नागरिकांना प्रथम भूकंप झाल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी घराबाहेर रस्त्यावर पळ काढला. बाहेर पडल्यानंतर काहीच समजत नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. अखेर एमआयडीसीमध्ये स्फोट झाल्याचे समजताच सर्व जण पुन्हा घरात गेले.
---------------------------------
धुरामुळे दमछाक
आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या अग्मिशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र प्रचंड प्रमाणात धूर पसरलेला असल्याने कोणत्या कंपनीला आग लागली आहे, किती कंपन्यांचा आगीने ताबा घेतला आहे, याचा अंदाजच येत नव्‍हता. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची मोठी दमछाक झाली.
-----------------------------------------------------
आमची माणसे कुठे शोधू?
अनेकांचे नातेवाईक हे बेपत्ता असून त्यांचा शोध लागत नसल्याने हेल्पलाइन नंबर आहे का, ज्याच्यावर संपर्क साधून आपल्या माणसांचा शोध घेता येईल किंवा आपली माणसे बेपत्ता आहेत, हे सांगता येईल, याचादेखील नागरिक शोध घेत होते. मात्र, त्यांना असा कोणताही हेल्पलाइन नंबर नसल्याचे समजल्यामुळे निराशा होत होती. आम्ही आमची माणसं कशी शोधायची, कुठे शोधायची, असा प्रश्न व्याकुळतेने विचारत होते.
------
स्टेशन परिसरही हादरला
डोंबिवली रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, त्याचे हादरे स्टेशन परिसरात जाणवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com