सीएनजी एसटी चालकांना उष्म्याच्या धोका

सीएनजी एसटी चालकांना उष्म्याच्या धोका

ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) : प्रदूषणाला आळा घालता यावा, यासाठी ठाण्यातील खोपट एसटी आगाराने डिझेलवर चालणाऱ्या सुमारे ३० गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने गाडीचालकांच्या जीविताची कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. चालक बसत असलेल्या केबिनच्या खिडक्या कायमच्या बंद केल्याने बाहेरील वारा आत येणे बंद झाले आहे. केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनची गरम हवा जमा होत आहे. भरधाव गाडी सुरू असताना चालकाला उष्माघात झाल्यास गाडीतील प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहचणार आहे.

अनेक संकटांचा सामना करणाऱ्या एसटीचालक आणि प्रवाशांच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडली आहे. प्रदूषण टाळण्याच्या हेतून एसटी महामंडळाने डिझेलच्या गाड्यांचे सीएनजीत रूपांतर करण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार ठाण्यातील खोपट एसटी आगाराच्या सुमारे ३० डिझेल गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने चालकाच्या केबिनमध्ये उजव्या बाजूला असलेल्या मूळ खिडक्यांच्या काचा कायमच्या बंद केल्या आहेत. त्यामुळे गाडी धावतानाही चालकाच्या केबिनमध्ये बाहेरील वारा आत येत नाही. शिवाय केबिनमध्ये इंजिनमुळे प्रचंड प्रमाणात गरम होते. गेल्या महिन्यात केबिनमधील गरम हवा सहन न झाल्याने एका चालकाला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. या चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु अशा प्रसंगानंतरही आगार व्यवस्थापकाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नसल्याचे येथील काही चालकांनी सांगितले. चालकांच्या दुर्दैवाने अशा गाड्या ४००-५०० किलोमीटरपर्यंत लांब पाठवल्या जात आहेत. त्यामुळे चालकासोबतच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सीएनजी गाड्यांमधून रूपांतर करण्यात आलेल्या गाड्यांची दुरुस्ती करणेही अवघड झाले आहे.

गेल्या महिन्यात एका चालकाला केबिनमधील उष्ण हवेमुळे उष्माघाताचा त्रास झाला. त्याला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. सीएनजी गाड्या चालवताना खूप गरम होते. बाहेरील हवा आत येत नाही. पूर्वीच्या डिझेल गाड्यांच्या खिडकीच्या काचा उघडता बंद करता येत होत्या. परंतु आता त्या कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्या चालवणे फारच कठीण झाले आहे.
- चालक, खोपट आगार

डिझेल गाड्यांमध्ये बदल करून सीएनजी गाड्यात रूपांतर करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या २०० गाड्या ठाणे जिल्ह्यात आहेत. गाडीच्या खिडक्या उघडत नसल्याने त्रास होतोय अशी कोणत्याही चालकाची तक्रार आलेली नाही अथवा कोणाला चक्कर आल्याची माहिती नाही.
- विलास राठोड, विभाग नियंत्रक, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com