महागाईने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

महागाईने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा
खर्डी, ता. २ : सध्या शेतीसाठी बाजारात उपलब्ध असलेली खते, अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेती कशी करायची? या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मात्र, तरी शेतकरी खत, बियाणे व साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. शेतीसंबंधित साहित्य महाग झाल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे. दरम्यान, भातशेती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, फळ, फुल लागवडीकडे शेतकऱ्यांची ओढ लागली आहे.
दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या वर्षी शेतीच्या साहित्याचे दरवाढीचे नवे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगामात शहापूर तालुक्यात शेतकरी भात या एकमेव पिकाची शेती करतो. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजूर खर्च वाढलेले असतानाच, ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलचे दरही वाढत आहेत. यावर्षी खते, बियाणे, औषधांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अनेक वेळा नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे दुरापास्त झालेली असतानाच, शेतीसंबंधित साहित्य आणि खतांच्या भाववाढीने शेतकरी कोलमडून गेला आहे. सततच्या महागाईने येथील भातउत्पादक शेतकरी त्रस्त झाला असून फळ, फुल लागवडीकडे वळताना दिसत आहे. कमी मेहनत करून जास्त उत्पन्न मिळावे, यासाठी नवनवीन उपाययोजना करत आहेत.

नवनवे प्रयोगाचा अवलंब
येथील भातउत्पादक शेतकरी नवनवे प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहे.

नवे संकट
नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता खते, कीटकनाशके, तणनाशके औषधे यांच्यावरील अनुदान कमी केले आहेत. त्यात आता त्यां‍चे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. नैसर्गिक संकटांसोबत लढणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सरकारने लादलेल्या किमतीचे नवे संकट उभे ठाकले आहे.

शहापूर तालुक्यात स्वस्त खते उपलब्ध होत नसल्याने संशोधित व संकरीत भातबियाण्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना महाग खतांची खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा वापर कमी करून मिश्र खत व संयुक्त खताचा वापर करावा जेणेकरून उत्पन्न जास्त येईल.
- दीपक भांगरथ, कृषीतज्ज्ञ‍

अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याने ही महागडी खते घ्यावीच लागतात. शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत राहावी यासाठी शेती करत आहे.
- सुरेश घावट, शेतकरी

शेतकऱ्यांनी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, मुरेट ऑफ पोटॅशह्या खतांचा आधुनिक आणि शास्त्रशुद्ध सुधार पद्धतीने वापर केल्यास पीक चांगले भरघोस येऊन उत्पन्नही वाढेल.
- गोकुळ अहिरे, कृषी सहायक, खर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com