फ्लेमिंगोंच्या अधिवासावर ड्रोनची टांगती तलवार

फ्लेमिंगोंच्या अधिवासावर ड्रोनची टांगती तलवार

वाशी, ता. १ (वार्ताहर) : फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासावर संकट येणाऱ्या घडामोडी नेहमीच घडत राहतात. यामुळे फ्लेमिंगोंच्या नवी मुंबईतील अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या विमान अपघातात फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला असताना आता ड्रोनमुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांकडून पोलिसांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
दहा दिवसांपूर्वी एमिरेट्स कंपनीचे विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन तब्बल ३९ फ्लेमिंगो ठार झाले होते. अलीकडे फ्लेमिंगोंना जवळून पाहता यावे याकरिता पक्षीप्रेमींकडून पाणथळ भागात ड्रोन उडवले जात आहेत. यादरम्यान काही वेळा फ्लेमिंगोंच्या १ ते २ फूट अंतरावरून ड्रोन उडवले जात असल्याची तक्रार नॅटकनेक्ट फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा- १९७२ अन्वये वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या अन्य प्रजातींच्या संरक्षणाची तरतूद असून नाजूक पक्ष्यांना ड्रोनच्या फिरणाऱ्या धारदार प्रोपेलर ब्लेडमुळे इजा होऊ शकते. हे ड्रोन फ्लेमिंगोंच्या उड्डाणावेळीही फ्लेमिंगोंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत असतात. जे अतिशय धोकादायक असून ड्रोनला फेलिंगो झोनपासून वेगळे ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची मागणी आम्ही केली असल्याचे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी. एन. कुमार यांनी सांगितले. कुमार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक, नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि मँग्रोव्ह सेल यांनादेखील मेलद्वारे तक्रार केली आहे.

-----------
पक्ष्यांना पळवून लावण्याचा घाट
ठाणे खाडीत भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्यावर नवी मुंबईतील टीएस चाणक्य, एनआरआय आणि डीपीएस फ्लेमिंगो झोनमध्ये उतरणाऱ्या पक्षांना ड्रोन त्रास देत असल्याचे नवी मुंबईतील मोठ्या पाणथळ भागांवर नजर ठेवून असलेल्या टीसीएसएफच्या वेटलँड सॅटेलाईटने सांगितले आहे. तसेच बऱ्याचदा पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी दगड मारले जात असल्याचेही पर्यावरणवाद्यांनी सांगितले. सिडकोकडून पर्यावरण आणि पर्यावरणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून पाणथळ जमिनी विकसित करण्याचा घाट घातला जात आहे, असे नॅटकनेक्ट फाऊंडेशनने सांगितले.

----------
ड्रोन उडवणाऱ्या उत्साही लोकांना हे माहीत नसेल, की ड्रोनमुळे यांच्या आवडत्या पक्ष्यांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अशा लोकांमध्ये ड्रोन आणि फ्लेमिंगोंबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच फ्लेमिंगो पक्षांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
- रेखा सांखला, सेव्ह फ्लेमिंगो अँड मँग्रोव्हज

-----------
ड्रोनची संस्कृती विषाणूप्रमाणे पसरत असून फ्लेमिंगो झोनमध्येच बहुतेकदा दिसून येते. अनेक पक्षीप्रेमी फ्लेमिंगोंना जवळून पाहता यावे, यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत; मात्र त्यामुळे त्यांना धोका पोहचत आहे. हे कोण करत आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.
- ज्योती नाडकर्णी, पक्षीप्रेमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com