बालमृत्यू रोखण्यासाठी पालिका सरसावली

बालमृत्यू रोखण्यासाठी पालिका सरसावली

पनवेल, ता. १ (बातमीदार) : मातामृत्यू व बालमृत्यू टाळण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंत्र व लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ व वैद्यकीय गर्भपात कायद्याबाबत संवेदीकरण करण्याच्या दृष्टीने पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघामध्ये नुकतेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत पीसीपीएनडीटी कायद्याबाबतच्या तरतुदी, त्यातील बदल याबाबत विधी सल्लागार ॲड. अर्चना शेगावकर व एमटीपी कायद्याबाबत डॉ. संतोष जायभाये यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. गिरीश गुणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा चांडक, डॉ. माया काळे, डॉ. वाळके, सर्व वैद्यकीय अधिकारी, महापालिका कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी सेंटर्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. अर्चना शेगावकर यांनी गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ या कायद्याची उद्दिष्टे, या कायद्यांतर्गत रजिस्ट्रेशन, सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, सोनोग्राफी मशीन निर्लेखन, केंद्रामधील आवश्यक सूचना फलक, रुग्णाचे रेकॉर्ड, अल्ट्रा साऊंड मशीनची खरेदी व विक्री, पोर्टेबल मशीनची माहिती, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत मिळणारी शिक्षा यासंबंधी माहिती दिली.

--------------
रुग्णालयाच्या संचालकांना मदतीचे आवाहन
डॉ. संतोष जायभाये यांनी वैद्यकीय गर्भपात कायदा २०२१ची वैशिष्ट्ये, सुरक्षित गर्भपाताचे निकष, या कायद्यांतील पूर्वीच्या तरतुदी व २०२१ मध्ये बदलेल्या तरतुदी, गोपनीयता व सुरक्षितता अशा विविध घटकांची माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. डॉ. गिरीश गुणे यांनी पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी उपस्थित रुग्णालयाच्या संचालकांना मदतीचे आवाहन केले. तसेच मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनासोबत एकत्रित उपाययोजना राबविण्यास सहकार्य करावे, असे सांगितले.

------------
पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कार्यक्षेत्रात शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यूचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनी महापालिकेस सहकार्य करावे. तसेच खासगी रुग्णालयातील पीसीपीएनडीटी केंद्रे व एमटीपी केंद्रे यांनी ‘बेटी बचाओ’ या आंदोलनात सहभागी होऊन मदत करावी. स्त्रीभ्रूण हत्यासंदर्भात जनजागृती करावी.
- डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com