..तर मौखिक कर्करोग हद्दपार होईल

..तर मौखिक कर्करोग हद्दपार होईल

ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी त्यापासून होणारे दुष्परिणाम काय असतात, याची माहिती आतापासूनच मुलांना देणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांवर चांगले संस्कार करतेवेळी पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे, याबाबत मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.
रुग्णालयाने जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हील रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार म्हणाले, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो. पक्षाघात, कर्करोग आणि टाइप दोन मधुमेहाचा धोकाही वाढत असल्याचे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. या निमित्त काढलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला.
तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देत असते. यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावे, सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे, दोन महिन्यांनी दाताचा ब्रश बदलावा, सहा महिने अथवा एक वर्षाने दंत चिकित्सकांकडून दाताची नियमित तपासणी करावी, जेवल्यावर पाण्याने खळखळून चूळ करावी असे फलक रॅलीत दाखवण्यात आले. या रॅलीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी अणि अभिजित डोईफोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉ. हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉ. श्रीविद्या जयकुमार, सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनावणे, डॉ. अर्चना पवार, पोलिस उपनिरीक्षक दिपेश किणी यांच्यासह रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आजाराची लक्षणे
* घसा खवखवणे. वारंवार तोंड येणे.
* हिरड्यांना अचानक सूज येणे.
* तोंडातून रक्त येणे/ तोंडात रक्तस्त्राव होणे.
* अन्न चावताना व गिळताना त्रास होणे.
* तोंडाच्या आतल्या आवरणावर सफेद डाग येणे.
* दात अचानक सैल होणे.
* जिभेवर लाल/पांढरे डाग दिसणे.
* कानात वेदना जाणवणे.
* गळ्यात गाठ होणे.
* जबडा सुजणे व जबड्याची हालचाल करताना त्रास होणे.
* ओठांचा बधीरपणा. आवाज बसणे.
* पाणी पितानाही प्रचंड वेदना होणे.
* जबड्याची हालचाल करताना त्रास होणे.

वाहनचालकांना टोप्यांचे वाटप
ठाणे सिव्हील रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनचालकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार आदींच्या हस्ते टोप्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली.

भारतामध्ये दरवर्षी सुमारे एक लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. त्यामुळे मौखिक स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तोंडात पांढरा किंवा लाल रंगाचा चट्टा दिसला, तर त्वरित सिव्हील रुग्णालय दंत विभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. अर्चना पवार, दंतशल्य चिकीत्सक सिव्हिल रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com