मिठीची मगरमिठी

मिठीची मगरमिठी

‘मिठी’ची मगरमिठी
पावसाळा तोंडावर आल्याने काळजात धस्स; पालिकेच्या दाव्यानंतरही रहिवाशांच्या मनात भीती कायम

भाग - १
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पावसाळा तोंडावर आल्याने पालिका प्रशासनाकडून नालेसफाईबरोबरच मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, संरक्षक भिंत उभारण्याचे जवळपास ९० टक्क्यांहून अधिक कामे झाल्याचा दावा केला जात आहे. सर्वकाही आलबेल असल्याचे प्रशासनाकडून दाखवले जात असले तरी ग्राउंडवरची परिस्थिती काही वेगळीच आहे. मिठीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांत कचऱ्याचे ढीग तसेच असून मिठीतही गाळाचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे पावसाळ्यात २६ जुलैसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागणार का, या भीतीने मिठीलगतच्या रहिवाशांच्या काळजात धस्स होत आहे.

मिठी नदीला २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे चांदिवली, सफेद पूल, जारीमरी, शांती नगर, तानाजी नगर, क्रांती नगर, किसमत नगर, कपाडिया नगर, टॅक्सीमन कॉलनी, कुर्ला कोर्टसह तकीयवार्डचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने पावसानंतर पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत आदी काम हाती घेण्यात आले होते. या कामावर आतापर्यंत सुमारे १,६५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तरीही या परिसरात घरात घुसणाऱ्या पाण्याची भीती राहिवाशांच्या मनात कायम आहे.

मातीचा भराव निघणार का?
मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी पालिकेने नुकतीच शांती नगर, कुर्ला-कलिना पुलालगत असलेली बांधकामे तोडली असून तेथे रुंदीकरण आणि संरक्षक भिंतीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बहुतांश मातीचा भराव नदीच्या दोन्ही बाजूंनी आहे. त्यामुळे तो तत्काळ न हटवल्यास शांती नगर, क्रांती नगर, किस्मत नगर परिसरात पाणी भरण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

संरक्षक भिंतीच्या उंचीत दुजाभाव
मिठीच्या पुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर पडू नये, यासाठी दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारली असली तरी त्याच्या उंचीत दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. एअरपोर्टच्या बाजूला सुमारे आठ-दहा मीटर उंचीची भिंत असली तरी सफेद पूल, जारीमरी परिसरात संरक्षक भिंतीची उंची केवळ पाच-सात मीटर एवढी आहे. त्यामुळे पुराचे पाणी झोपडट्टीमध्येच शिरणार असल्याची भीती रहिवासी व्यक्त करीत आहेत.

ग्राफिक्स
मिठीच्या साफसफाईचे आव्हान
- तिसऱ्या टप्प्यात तीन हजार कोटींचा खर्च
- मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण
- संरक्षक भिंतीचे काम ९० टक्क्यांपर्यंत
- पुढील १० वर्षांसाठी तीन हजार ६७ कोटी खर्च
- मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर
- सात हजार २९५ हेक्टर एवढे पाणलोट क्षेत्र
- नदीला अनधिकृत बांधकामाचा विळखा

अनधिकृत बांधकामाचा विळखा
२६ जुलै २००५च्या पुरानंतर मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाअंतर्गत विविध टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सेवा रस्ता बांधण्याचे काम केले जात आहे. मिठी नदीला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून अनेक ठिकाणी पात्र ८०-१०० मीटर एवढे अरुंद झाले आहे. चांदिवली, साकीनाका, जारीमरी, बैलबजार, सीएसटी रोड परिसरात असलेल्या छोट्या- मोठ्या उद्योगातील रसायनमिश्रित आणि झोपडपट्टीमधील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पुरती दूषित झाली आहे.

दरवर्षी मिठी नदीतील गाळ काढल्याचा, साफसफाई केल्याचा दावा पालिका करते. मात्र, जारीमरी, तानाजी नगर, शिवाजी नगर, शांती नगर, क्रांती नगर परिसरातील झोपडपट्टीत मिठीचे पाणी भरतेच. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती कायम असून त्यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
-जगन्नाथ उदुगडे, सामाजिक कार्यकर्ते
...
मिठी नदीत आजही अनेक ठिकाणी गाळाचा खच दिसत आहे. नुसता निधी खर्च करण्यासाठी कामे करणे योग्य नाही.
-लियाकत अन्सारी, रहिवासी
......
नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे नेहमीच मिठी नदीतील गाळ काढला जातो. तरीही नदी परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसणारे पाणी थांबत नाही. त्यामुळे रुंदीकरण, गाळ उपसा अशी नुसती मलमपट्टी न करता दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.
-रामदास वाल्मिकी, रहिवासी
...
पावसाळ्यात पुराचे पाणी घरात शिरते तेव्हा झोपडपट्टीवासीयांचे मोठे नुकसान होते. पुराच्या पाण्यातून कशी सुटका होईल, यावर पालिकेने लक्ष केंद्रीत करावे.
-आनंद शेवडे, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com