मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोण विजयी होणार आणि कुणाला पराभवाला सामोरे जावे लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. याबाबत राजकीय अंदाज बांधण्याची चढाओढ सुरू झाली असून ठाणे जिल्हा प्रशासनानेही आपली प्रत्यक्ष मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी शिस्तबद्ध व्हावी, यासाठी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघानुसार विभागणी केली आहे. प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल्स याप्रमाणे ठाणे, कल्याण व भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मोजणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठी पोलिसांचाही फौजफाटा तैनात असणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी २१ मे रोजी मतदानप्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण ६६ लाख ७६ हजार ८३७ मतदारांपैकी सुमारे ५४ टक्के म्हणजे ३५ लाख ९९ हजार ८८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात महिला मतदारांची संख्या १६ लाख ११ हजार ४६४ तर पुरुष मतदारांची संख्या १९ लाख ८८ हजार १६६ इतकी होती. २६० तृतीयपंथीयांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मतदानाच्या दिवशी झालेल्या गोंधळनाट्यानंतरही यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यात यश आले आहे; मात्र मतदानयंत्रांत बंदिस्त झालेला जनतेचा हा कौल कुणाच्या बाजूने लागणार हे ४ जूनला मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.

मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम सोमवारी, ३ जून रोजी मतमोजणीस्थळी सकाळी ११ वाजता होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक सुपरवायझर, दोन मतमोजणी सहायक व एक सूक्ष्मनिरीक्षक असतील तर प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक मतमोजणी सुपरवायझर, पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक केली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. यासाठीही स्वतंत्र १४ टेबलची व्यवस्था केली आहे. एकूण एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणी प्रक्रियेसाठी केली आहे. तर एकूण ६५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे.

ओवळा-माजिवड्यात मोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या
ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ओवळा- माजिवडा विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी ३४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. या मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांनतर मीरा भाईंदर- ३३ फेऱ्या, कोपरी- पाचपाखाडी- २४, ठाणे शहर- २६, ऐरोली- ३१ तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी २८ फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली.

भिवंडीत १०६ टेबलवर मतमोजणी
प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबलची व्यवस्था केली असली तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा यासाठी अपवाद ठरणार आहे. या विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी २१ टेबल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ८४ नव्हे तर १०६ टेबलवर मतमोजणी होणार आहे.

टपाली मतपत्रिकांची मोजणी
भिवंडी ग्रामीण- २५ फेऱ्या, शहापूर- २४, भिवंडी पश्चिम- २२, भिवंडी पूर्व- २३, तर कल्याण पश्चिम- २९ आणि १३९ मुरबाड याकरिता २१ फेऱ्या होणार आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांच्या अधिपत्याखाली टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. यामध्ये गृहमतदान, दिव्यांग मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे एकूण ४,२६३ मतदान आहे, तर सर्व्हिस व्होटरची संख्या आजपर्यंत ११६ आहे. असे एकूण ४,३८९ टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे.

लोकसभानिहाय मतमोजणी केंद्र
ठाणे- न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प.)
कल्याण- वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृह, डोंबिवली पूर्व.
भिवंडी- के.यू.डी. कंपाऊंड, सावद गाव, सापे-पडघा रोड, पोस्ट आमणे, भिवंडी तालुका.

१) ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या - ६६ लाख ७६ हजार ८३७
२) जिल्ह्यातील मतदानाचा टक्का - ५४ टक्के
३) ३५ लाख ९९ हजार ८८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
४) महिला मतदारांची संख्या १६ लाख ११ हजार ४६४
५) पुरुष मतदारांची संख्या १९ लाख ८८ हजार १६६ इतकी होती.
६) २६० तृतीयपंथींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com