पवईत दरड कोसळण्याची भीती कायम

पवईत दरड कोसळण्याची भीती कायम

पवईत दरड कोसळण्याची भीती कायम
इंदिरानगर, गौतमनगरमधील रहिवाशांची सुरक्षा ऐरणीवर
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः पवईत येथील इंदिरानगर व गौतमनगर या वस्त्या डोंगरपायथ्याशी वसलेल्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना दर वर्षी घडत असतात. यंदाही प्रशासनाने थातूरमातूर उपाययोजना केल्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही इथल्या राहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे की नाही, याबद्दलही माहिती नाही.
पवई येथील गौतमनगर व इंदिरानगर, स्वामी नारायणनगर, हरिओमनगर आणि गरीबनगर या परिसरात मोठी लोकसंख्या आहे. यातील इंदिरानगर व गौतमनगराला पावसाळ्यात दरडीचा धोका अधिक आहे. या डोंगराळ लोकवस्तीत ब्रिटिशकालीन डक लाईन, पाण्याचा निचरा करण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यावर पालिका प्रशासनाने काही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे भौगोलिक दुर्गम असलेल्या या भागात पावसाळ्यात भेगामध्ये पाणी साचते. जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग आहे. या ठिकाणी दगडाची संरक्षण भिंत बांधली गेली आहे. त्या ऐवजी आरसीसीची मजबूत भिंत बांधायला हवी; अन्यथा पाण्याच्या प्रवाहामुळे भिंत पडेल, अशी भीती इथल्या राहिवाशांनी व्यक्त केली आहे.
२०२२ मध्ये भारत भूषण यांच्या घरावर दरड कोसळली; मात्र त्यांना आजपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही. उद्ध्वस्त घराचा पंचनामा झाला. चार महिने दुसऱ्या ठिकाणी भाड्याच्या घरात दिवस त्यांना काढावे लागले. भारत यांनी व्याजाने पैसे काढून घर बांधले, मात्र कुणीही मदतीसाठी आले नसल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
इंदिरानगरच्या खालोखाल चैतन्यनगर व डोंगराला लागूनच बॉम्बे पब्लिक स्‍कूल आहे. त्यामुळे भविष्यात दरड कोसळण्याची घटना घडल्‍यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आला की, पालिका प्रशासन धोकादायक घरे असल्याची नोटीस देते आणि तुम्हीच तुमचे पुनर्वसन करा, असे सांगितले जाते. पावसाळ्यात आम्ही जायचे कुठे, असा सवाल विचारत दर वर्षाप्रमाणे या वेळीही जीव मुठीत घेऊन राहण्याशिवाय पर्याय नसल्याचा भावना इथल्या रहिवाशांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली आहे.

जीव गेल्यावर जाग येणार का?
या दरडप्रवण धोकादायक परिसरात दगडाच्या नव्हे, तर आरसीसीची संरक्षक भिंती बांधण्यात यावी. तसेच दरडींवर संरक्षण जाळ्या लावण्यात याव्यात, यासाठी सातत्याने सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करत आहेत; मात्र पालिका आणि म्हाडा अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक खासदार, आमदार, व नगरसेविका पाहणी करून फक्त आश्वासन देतात; मात्र अद्याप संरक्षण भिंत व संरक्षण जाळी बांधण्यात आलेली नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते भाऊ पंडागळे यांनी केला आहे.

डोंगराळ भाग परिसरात संरक्षण भिंत बांधण्यासाठी मी स्वतः पत्रव्यवहार केला आहे. खासदार फंडातून संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे; मात्र त्या कामाबद्दल मी माहिती घेते. पालिका दर वर्षीप्रमाणे नोटीस देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करते.
- वैशाली पाटील, माजी नगरसेविका
................
संरक्षण भिंत बांधणे व संरक्षण जाळी लावणे, हे काम म्हाडा व जिल्हाधिकाऱ्यांकडे येते. महानगरपालिका धोकादायक घरांना नोटीस देते, पुनर्वसन करा, असे आवाहन करते.
- प्रशांत मेहेर खांब, अभियंता, एस विभाग
..........................................
इंदिरानगर भागात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. एखादी घटना घडली की म्हाडा, पालिका, जिल्हाधिकारी, प्रतिनिधी येऊन संरक्षण भिंत व जाळी बांधून देऊ, असे तात्पुरते आश्वासन देतात; मात्र त्याचे काहीच होत नाही. या वेळी अपघात झाला, तर त्याला प्रशासन जबाबदार असेल.
- भाऊ पंडागळे, सामाजिक कार्यकर्ते

ग्राफीक्स
दरडीच्या समस्या कायम
१. संरक्षण भिंती दगडाऐवजी आरसीसीच्या बनवा
२. दरडप्रवण सरंक्षक जाळ्या बसवल्या नाही
३. कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणीची दखल नाही
४. पावसाळ्यात केवळ नोटीसी मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com