मेगाब्लॉकमुळे घरकामाला दांडी

मेगाब्लॉकमुळे घरकामाला दांडी

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा फटका मुंबईतील भायखळा, दादर, घाटकोपर आणि अंधेरी येथे असलेल्या उच्चभ्रू सोसायट्यांमधील कुटुंबांना बसला. या सोसायट्यांमध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरातून घरकामासाठी येणाऱ्या महिलांनी घरीच राहणे पसंत केल्याने घरातील कामे करण्याची वेळ गृहिणींवर आली होती.
उपनगरीय लोकल सेवेला मुंबईकरांची जीवनवाहिनी, असे नेहमीच संबोधले जाते; पण त्या मागच्या कारणांची प्रचीती आज मेगाब्लॉकमुळे दिसून आली. उपनगरातून दररोज लोकलने मुंबईतील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरकामासाठी येणाऱ्या अनेक महिलांना मेगाब्लॉकमुळे कामाला जाता आले नाही. त्यामुळे अचानक सुटी घेतल्यामुळे अनेक घरात कामावर जाणाऱ्या पती-पत्नीची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना मुलांना सांभाळण्याची समस्या निर्माण झाली. तर अनेकांवर सुटी घेऊन स्वतःच घरातील कामे उरकण्याची वेळ आली.
----------------------------------------------
साहेब पगार कापू नका!
भायखळ्यातील राणीबाग भागातील एका सोसायटीत घरकाम करणाऱ्या हेमलता यांनी कामावरून सुटी घेतली. भायखळ्यात राहणाऱ्या एका मैत्रिणीला त्यांनी आजचा दिवस निभावून नेण्याची विनंती केली. हेमलता यांच्याप्रमाणे अनेक घरकाम करणाऱ्या महिला कामावर गेल्या नाहीत. त्यामुळे एक दिवसाचा पगार बुडेल, अशी चिंता या महिलांना सतावत आहे. कृपया आमची प्रवासाची अडचण समजून घ्या आणि शनिवारचा पगार कापू नका, अशी विनंती या घरकाम करणाऱ्या महिलांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केली.
-------------------------------------------
दररोज बदलापूर ते ठाणे लोकलने प्रवास करते. ब्लॉकमुळे शनिवारी कामावर गेले नाही. यासंदर्भात आम्ही घरमालकांना कळवले आहे.
- अनिता जाधव, बदलापूर
------------
लोकल सेवेच्या फेऱ्या कमी होणार असल्याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे शनिवारी घरकामाला जाणे टाळले. यासंदर्भात पूर्वसूचना दिली आहे.
-प्रेमिला घोंगडे, कल्याण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com