सहा दिवसांपासून नाल्यात पडलेल्या मांजराची सुटका

सहा दिवसांपासून नाल्यात पडलेल्या मांजराची सुटका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : लोकग्राम येथे नाल्यात सहा दिवसांपासून एक मांजर अडकून पडले होते. या नाल्याची भिंत उंच आहे. तसेच मांजराला दुखापत झाल्याने त्याला बाहेर पडता येत नव्हते. याची माहिती पॉज संस्थेला मिळताच त्यांनी काही तासातच मांजराची सुटका केली व त्याचे प्राण वाचवल्याची माहिती पॉज संस्थेचे नीलेश भणगे यांनी दिली.

कल्याण पूर्वेतील नाल्यात सहा दिवसांपासून एक मांजर अडकून पडले होते. पॉज संस्थेला स्थानिक फीडर गौरव समर्थ याच्याकडून याविषयी कॉल आला. त्याने पॉजचे संस्थापक नीलेश भणगे यांना त्याची कल्पना दिली. ताबडतोब त्याच दिवशी बचावासाठी स्वयंसेवकांना पाठवण्यात आले. पॉज स्वयंसेवक अभिषेक सिंग आणि रीमा देशपांडे घटनास्थळी पोहचले. त्यांना आढळले की मांजर खूप वाईट अवस्थेत आहे, तथापि, नाल्याची भिंत ३० फूट उंच असल्याने फीडरने कॅरियरमध्ये अन्न दिले जे दोरीने बांधले होते, पण त्या मांजराला अपघात झाल्याने ते काहीही खात नव्हते. अभिषेक आणि रीमा हे दोरीच्या साहाय्याने गटारात उतरले. घाबरलेल्या मांजराला धीर देत त्याला प्लास्टिकच्या बास्केटमध्ये ठेवून त्याची यशस्वीपणे सुटका केली.

गौरव हे या मांजराची काळजी घेत आहेत. गेल्या आठवड्यात रस्त्यावरील कुत्रे पाठीमागे लागल्याने या लाडू नावाच्या मांजराने घाबरून नाल्यात उडी मारली; मात्र त्याला काही वर येता आले नाही, असे गौरव यांनी सांगितले. शेवटी अथक प्रयत्न करून सहाव्या दिवशी गौरव यांनी पॉजच्या टीमला पाचारण केल्याने लाडूचे प्राण वाचवण्यात यश आले.

पुरात प्राणी बचाव मोहीम
पॉजची टीम ही आपत्ती व्यवस्थापनमध्ये २००४ पासून काम करीत आहे. २००४ च्या त्सुनामीमध्ये प्रथम प्राणी वाचवण्यासाठी पॉजने औषधे पाठवली होती. २००५ मध्ये मुंबईच्या महापुरात देखील २०० प्राणी वाचवले होते. २०१५ च्या नेपाळमधील भूकंपात पॉजची टीम महिनाभर प्राण्यांना वाचवण्याचे काम करत होते. कोविड काळात रस्त्यावरील भटक्या प्राण्यांसाठी खाद्य पुरवठा केला. २०१८ च्या केरळ आणि २०२१ च्या महाडमधील पुरात प्राणी बचाव आणि लसीकरण केले होते. ठाणे जिल्ह्यात कुठेही पशु-पक्षी अडकतात तेव्हा पॉजची टीम त्यांच्या मदतीला धावून जाते, असे पॉजचे संस्थापक नीलेश भणगे यांनी सांगितले.

हिरो टू ॲनिमल्स पुरस्कार
कल्याणमध्ये कोरड्या विहिरीत गेले अनेक वेळा मांजर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात २००७ मध्ये नीलेश भणगे आणि २०१४ ला मंदार सावंत यांनी खोल विहिरीतून मांजरांना वाचवले आहे. त्याकरिता पेटा या जागतिक संघटनेकडून दोघांचा हिरो टू ॲनिमल्स म्हणून गौरव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com