मोनो, मेट्रो पावसाळ्यासाठी सज्ज

मोनो, मेट्रो पावसाळ्यासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मोनो व मेट्रो पावसाळ्यात विनाअडथळा धावण्यासाठी सज्ज झाली आहे. वादळी वाऱ्याचा मेट्रोच्या वेगावर परिणाम होऊ नये, त्यावर सातत्याने लक्ष ठेवता यावे, यासाठी एमएमआरडीएने हवेचा वेग मोजण्यासाठी ठिकठिकाणी दहा ॲनिमोमीटर बसवले आहेत. तसेच स्थानकात आणि ट्रॅकवर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे उभारले आहेत. त्यावर नियंत्रण कक्षातून २४ तास पाहणी केली जाणार आहे.

एमएमआरडीएकडून मुंबईत चेंबूर ते सात रस्ता मोनो रेल्वे; तर अंधेरी-दहिसर-गुंदवलीदरम्यान मेट्रो चालवल्या जातात. पावसामुळे मोनो-मेट्रो सेवा खंडित झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे दोन्ही सेवा अखंडित सुरू राहावी, यासाठी हवेच्या वेगाचे निरीक्षण करून मेट्रो संचालनाचे नियोजन करण्यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या दहा मेट्रो स्थानकांवर ॲनिमोमीटर बसविले आहेत. हे ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजतात. त्यामुळे मेट्रो वेळेवर धावण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे प्लॅटफॉर्म, स्थानकाखालील रस्ता आणि कॉन्कोर्सेस लेव्हल यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष ठेवतात. सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे २४ तास पाळत ठेवण्यात येत आहे. तसेच मेट्रो व्हायाडक्ट आणि डेपोच्या बॅलेस्टेड आणि बॅलेस्टलेस ट्रॅकवर तपासणी करण्यात आली. अग्निसुरक्षा यंत्रणा, मलनिस्सारण वाहिनी, पॉवर फेल्युअर प्रोटेक्शन सिस्टमची तपासणी पूर्ण झाली आहे, त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याची तयारीही करण्यात आल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन नियंत्रण कक्ष
एमएमआरडीएने आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच पूरस्थितीसारख्या आपत्तीदरम्यान रस्ते वाहतूक ठप्प झाल्यास वाढीव प्रवासी संख्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी मेट्रो आणि मोनोच्या सेवांची वारंवारता वाढवण्याची तरतूद केलेली आहे. मेट्रो आणि मोनो प्रवासी आपत्कालिन परिस्थितीत १८००८८९०५०५/ १८००८८९०८०८ या हेल्पलाइनद्वारे संपर्क साधू शकतात. त्यासोबतच ८४५२९०५४३४ या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून मोनो रेलच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com