माथेरानमधील पार्किंग फुल्ल
घाटात वाहतूक कोंडी झाल्याने टॅक्सीचालक आक्रमक

माथेरानमधील पार्किंग फुल्ल घाटात वाहतूक कोंडी झाल्याने टॅक्सीचालक आक्रमक

माथेरानमधील पार्किंग फुल्ल
घाटात वाहतूक कोंडी झाल्याने टॅक्सीचालक आक्रमक

नेरळ, ता.२ (बातमीदार) : माथेरान घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांच्या उत्साहाचा फियास्को झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे नेरळ, माथेरान टॅक्सीचालकांना देखील त्रास होत असल्याने शनिवारी (ता.१) टॅक्सीचालक आक्रमक झाले. टॅक्सीचालकांनी तासभर माथेरान दस्तुरी नाका येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक कोंडी सोडवल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मुंबई-पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरानला पर्यटकांकडून पर्यटनासाठी पहिली पसंती दिली जाते. याठिकाणी विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे दस्तुरी नाका येथील वन विभागाचा वाहनतळ फुल्ल होत असल्याने पर्यटक घाटरस्त्यात जागा मिळेल तिथे आपली गाडी पार्क करून पर्यटनासाठी माथेरानमध्ये दाखल होत आहेत. परिणामी अस्ताव्यस्त रस्त्यावर गाड्या लागल्याने इतर गाड्यांना त्याचा त्रास होतो. या गोंधळामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना पर्यटक आणि नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक यांना करावा लागत आहे. त्यातच अनेकदा घाटात अडीच किमीच्या रांगा लागून शेवटी पर्यटकांवर चालत जाण्याची वेळ येते. शनिवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने काही तासातच येथील वाहनतळ फुल्ल झाले, तर त्यानंतर उद्भवलेल्या वाहतूक कोंडीचा फटका येथील टॅक्सीचालकांना बसला. यावेळी टॅक्सीचालकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे गोंधळात आणखीच भर पडली. यावेळी नेरळ व माथेरान पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक कोंडीचा गुंता सोडवला व टॅक्सी संघटनेची समजूत काढली. त्यामुळे टॅक्सीचालकांनी आपले आंदोलन मागे घेतले, मात्र या नेहमीच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी टॅक्सीचालक व पर्यटकांनी केली.


..
रविवारी कठोर नियोजन
शनिवारी माथेरान दस्तुरी नाका येथे उद्धवलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर रविवारी नेरळ पोलिसांनी कठोर नियोजन केले. वाहनतळावरील गाड्यांची माहिती घेत पर्यटकांच्या गाड्या पुढे सोडण्यात आल्या. रविवारी काही वाहने नेरळ येथेच पार्किंग करून पर्यटकांना माथेरानला पाठवण्यात येत होते.

..
माथेरान येथील वाहनतळावरील पार्किंग फुल्ल होत असल्याने त्याचा पर्यटक व टॅक्सीचालकांना त्रास होतो. घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना कधी कधी चालत जावे लागते. हे चित्र बदलले गेले पाहिजे. त्यासाठी वाहनतळाचा प्रश्‍न सोडवला पाहिजे. जुमपट्टी किंवा नेरळ हुतात्मा चौक येथे गाड्यांचे प्रशासनाने नियोजन करावे. जेणेकरून घाटरस्त्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही.
- संदेश साळुंके, टॅक्सीचालक, नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक संघटना
..
माथेरान येथे पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पर्यटक माथेरानमध्ये आले तरच येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
- चंद्रकांत चौधरी, माथेरान शहरप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com